खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अवैध धंद्यांना पोलिसांना जबाबदार धरत आमदार स्मिता वाघ यांनी तोफ डागत आमदार शिरीष चौधरींवर साधला निशाणा….

अवैध धंद्यांना पोलिस जबाबदार असल्याचा पत्रकातून केला आरोप

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात मोठ्याप्रमाणावर दारूचे गुत्ते, सट्टा, गुटखा विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांनी अमळनेकरांचे आरोग्य बिघडत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अमळनेरात नंदुरबार मार्गे अवैध पद्धतीने येणाऱ्या बनावट आणि विषारी दारूचा उद्रेक झाला असून शहरात ठिकठिकाणी दारूचे गुत्ते निर्माण झाले असून याला सर्वस्वी जबाबदार पोलिस असल्याचा आरोप आमदार स्मिता वाघ यांनी केला असला तरी त्यांनी पोलिसांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांच्यावर निशाना साधला आहे. कारण नंदुरबारात आमदार शिरीष चौधरी यांच्या हिरा ग्रुपच्या हॉटेल आहेत. म्हणूनच नंदुरबार मार्गे विषारी दारू अमळनेरात येत असल्याचा आरोप आमदार स्मिता वाघ यांनी आमदार शिरीष चौधरींना टार्गेट केले आहे..?
आमदार स्मिता वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, अमळनेर ही संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, पूज्य सानेगुरुजीची कर्मभूमी, श्रीमंत प्रताप शेठजींची दानभूमी आणि श्री मंगळग्रह देवाची मंगलभूमी आहे. या शहरास कोणत्याही प्रकारचा कलंक असू नये ही तमाम अमळनेरवासीयांची इच्छा आहे. यात प्रामुख्याने अवैध धंदे नष्ट करणे पोलिसांची जवाबदारी असताना तेच कुठेतरी कमी पडत असल्याचा जनतेचा आरोप आहे. या आधी असलेल्या पोलिस निरीक्षकांनी अवैध धंद्यांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याने या धंद्यावर अंकुश ठेवण्याऐवजी चालनाच मिळाली. यामुळे धरणगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अवैध धंद्यांसाठी कर्दनकाळ ठरणारे पोलिस निरीक्षक अंबादास मोरे अमळनेरात आल्यानंतर मात्र अवैध धंदे चालकांचे मित्र झाल्याची शंका येत आहे. त्यांच्याकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असताना ते देखील कमी पडताना दिसत आहेत. सुरुवातीला अवैध दारूचा कारखाना, गांजा तस्करी, गुटखा यावर कारवाई करून छाप पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र त्यानंतर पूर्णपणे ते शांत होऊन आपली तलवार त्यांनी म्यान केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका येऊ लागली आहे. कारण गुटख्या संदर्भात त्यांनी केलेल्या कारवाई मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून आठ ते दहा लाखांचा माल चिरीमिरी घेऊन सोडून दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यात काही स्थानिक व्यापाऱ्यांची नावे उघड होऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. यामुळेच या कारवाईनंतर शहर व तालुक्यात खुलेआम गुटखा विकला जात असून यातून पोलिसांचेच खिसे भरत असल्याचे स्पष्ट होत आहे. या गुटक्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होऊन कॅन्सर सारख्या भयंकर आजारास बळी पडत असल्याने या शहरातून गुटखा हद्दपार होणे आवश्यक आहे.
सट्ट्याच्या बाबतीतदेखील हीच परिस्थिती असून गल्लीबोळात याचे अड्डे थाटलेले आहेत. याचेही नियमित हप्ते ठरलेले असल्याने पोलिस याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, असा जनतेचा आरोप असून सट्ट्यापायी गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्याच पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून अमळनेरात नंदुरबार मार्गे अवैध पद्धतीने येणाऱ्या बनावट आणि विषारी दारूचा उद्रेक झाला असून शहरात ठिकठिकाणी दारूचे गुत्ते निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्य मार्केटसह शहरात खुलेआम ही विक्री सुरू असताना पोलिसांच्या नजरेस कसे येत नाही, हेच मोठे नवल आहे. वयात देखील न आलेली मुले या गुत्त्यावंर दिसतात, त्यावेळी पोलिसांच्या ठिसाळ कार्यपद्धतीवर संताप आल्याशिवाय राहत नाही ही सत्य परिस्थिती आहे.
वाहतुक पोलिसही कलेक्टर वाहतूक पोलीस देखील शहरात वाहतुकीची शिस्त लावण्याऐवजी कलेक्शन (कलेक्टर) करतानाच अधिक दिसून येतात. दगडी दरवाजाचा एक भाग कोसळल्याने येथून वाहतूक तूर्तास बंद असून गांधलीपुरा मार्गे वळवण्यात आली आहे. तेथे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे, मात्र याठिकाणी आठ ते दहा पोलिस एकाच ठिकाणी उभे राहून शिस्त लावण्या ऐवजी वाहनधारकांना विनाकारण त्रास देऊन पैसे उकळत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यामुळे जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पोलिसांना दिले आव्हान शहरात सुरू असलेले चुकीचे प्रकार आम्ही मुळीच खपवून घेणार नसून गुटखा, सट्टा,अवैध दारू आणि वाहनधारकांची लूट तात्काळ थांबवावेत आणि ही आमची पोलिस निरीक्षकांकडे आग्रही मागणी आहे. हा कलंक मिटवण्याचे आव्हानच लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांना देत असून त्यांनी हे आव्हान स्वीकारावे अन्यथा महिला भगिनींना रस्त्यावर उतरवून भव्य आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार स्मिता वाघ यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button