अमळनेर (खबरीलाल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा खान्देशात ८ ऑगस्ट रोजी पर्दापण करणार आहे. या यात्रेच्या पालखीचे भोई होण्यासाठी खान्देशातील अनेक नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहे. यात अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे एक नेतेही आपली ‘घड्याळ’ उतरवून ‘फुल’ हातात घेणार आहेत. मात्र ते मुळातच भाजपावासीय असल्याने ते आपल्या घरवापसीच्या तयारीत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केल्याने महाराष्ट्रातही पुन्हा कमळ फुलवण्यासाठी त्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे विरोधकांना नामोहरण करण्यासाठी भाजपाने विरोधक नेत्यांची पक्षात ‘मेघा भरती’ सुरू केली आहे. म्हणून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाच्या गोटात जाऊन भरती होत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतही भाजपाकडून तोच प्रयोग केला जात आहे. या यात्रेतच अमळनेर मतदार संघात बीजेपीकडून दोनदा विधानसभा निवडणूक लढवणारे ‘एबीपी’ ‘बीजेपी’ प्रवेशाच्या तयारीत आहे असे दिग्गज राजकारणी नेत्यांमध्ये दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे.. बीजेपीकडून त्यांनी २००९ आणि २०१४ अशा दोन पंचवार्षिक विधानसभा निवडणुका लढूनही त्यांना स्वगृही नेत्यांच्या बंडाळीमुळे पराभव पत्कारावा लागला होता. म्हणूनच ते या गृहकलाला कंटाळून अमळनेर मतदार संघातील माजी आमदारांच्या हातात हात घेऊन आपल्या मनटावर घड्याळ बांधले आहे. मात्र नगरपालिकेतील २२ नगरसेवकांच्या अपात्रते मुळे या माजी आमदारांनी आपले मनगटाचे घड्याळ बाजूला ठेवून कमळ हातात घेतले. त्यामुळे एबीपी हे एकटे पडले. त्यांनाही आता घड्याळाची टिक,टिक सहन होत नाही, पक्षात मन रमत नाही म्हणून पुन्हा ते आपल्या घरवापसीच्या तयारी असल्याचे राजकीय गोटातून बोलले जात आहे. त्यांचा हा गृहप्रवेश मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पाश्वभूमीवर दोन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपूर्वी एका मंदिरावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्यानंतर पक्षाच्या नेत्यांची ऍक्टिव्हिटीस बंदच दिसून येत असल्यामुळे चर्चेला ऊत आले आहे. मागील काळात त्यांनी अमळनेर मतदार संघात दोन वेळा भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली असली तरी आगामी निवडणुकीत तिकिटासाठी अत्यंत चुरस असल्याने ‘एबीपी’ला ‘झेडपीची सुभेदारी’ सोपवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.