भरदिवसा मुलगी पळवल्याच्या अफवेने पालक घाबरले, पोलिसांची उडाली त्रेधात्रिपीट

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात काल शनिवारी भर दुपारी तहसील कार्यालयासमोर पाचवीच्या वर्गाची दहा वर्षाच्या मुलीचे रिक्षातून अपहरण केल्याची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरली. पोलिस ठाण्याचा फोनही खनखनला आणि पूर्ण पोलिस यंत्रणाही कंबरकसून कामाला लागली. खुद्द पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या पोलिस ठाण्याची हद्द पिंजून काढली, पण कोणताही माग लागला नाही. तर रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे ही निव्वळ अफवा ठरल्याने पोलिसांची त्रेधात्रिपीट उडून नाहक त्रास सहन करावा लागला. कोणीतरी पोलिसांना खोडसळ पणाने त्रास देण्यासाठी हा प्रकार केल्याचे यातून दिसून आले. मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयासमोरून चालकाने रस्त्याने चालणा-या १० वर्षीय मुलीला रिक्षात ओढून पळवून नेल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यामुळे पोलिसांसह नागरिकांची चांगलीच धावपळही झाली. पोलिसांनी चौफेर शोध घेतला. पोलिस निरीक्षक मोरे यांनी आपल्या वाहनातून धुळे रस्त्याकडे अमळनेर तालुक्याची हद्द चोपडाई कोंढावळ गावापर्यंत मागोवा घेत पिंजून काढला. मात्र, या चर्चेबाबत काहीच आढळून आले नाही. त्यामुळे ही मुलीच्या अपहरणाची अफवा ठरली.

अफवा असली तरी पोलिस दक्षता बाळगून…..

कोणीतरी विनाकारण ही अफवा पसरवली. त्यामुळे पोलिसांनाही विनाकारण त्रास सहन करावा लागला. नागरिकांमध्येदेखील भीती निर्माण झाली होती. तरी पोलीस दक्षता बाळगून आहेत.
-अंबादास मोरे, पोलीस निरीक्षक, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *