अमळनेर (प्रतिनिधी) ज्या प्रताप महाविद्यालयातून इंग्रजी विषयाचे धडे गिरवले त्याच महाविद्यालयात इंग्रीज विभागाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती होण्याचा बहुमान मूळचे अमळनेर येथील रहिवासी आणि सध्यास्थित मुंबई येथील इंग्रजी माध्यमांचे वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना मिळाला आहे. असा बहुमान क्वचितच व्यक्तिंच्या नशिबी असल्याने त्यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
विद्यापीठ आयोगाने व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयास स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जास पुढील २० वर्षांसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रताप महाविद्यालयात नुकतेच इंग्रजी विभागासाठी अभ्यास मंडळ तयार करण्यात आले आहे. या अभ्यास मंडळावर सुधीर सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सूर्यवंशी हे मूळचे अमळनेर येथील असून ते सध्या डीएनए या इंग्रजी वृत्तपत्रात राजकीय, सामाजिक आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर लेखन करतात. मागील १५ वर्षांपासून ते मुंबई येथे माध्यमांमध्ये कार्यरत आहेत. सुरुवातीस त्यांनी मुंबई मिरर, फ्री प्रेस जरनल आदी इंग्रजी वृत्तपत्रात प्रभावी काम केलेले आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्र कार्यक्रमात ते सहभागी असतात. तर झी दिशाच्या विशेषअंकांसाठीही ते लेखन करतात. त्यांनी प्रताप महाविद्यालयातूनच बीए इंग्रजी विषयात शिक्षण घेतलेले आहे. तर पुणे विद्यापीठात एमए इंग्रजी आणि मास्टर इन जर्नालिझम केले असून नुकतेच मुंबई विद्यापीठातून एलएलबी हा कोर्स पूर्ण केला आहे. त्यांचा अनेक विषयांवर गाढा अभ्यास आहे. त्यांच्या पत्रकारितेतील कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांना सिंगापूर आणि स्वीडन या देशांनी सुद्धा इंटर कंट्री अभ्यासक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी प्रताप महाविद्यालयाने त्यांना अभ्यासक्रम निवड मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. या निवडीबद्दल सूर्यवंशी यांचे पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीं व मान्यवरांकडून आणि विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
शोध पत्रकारितेतून दांडगा संपर्क…
अंबानी कुटूंबाचा प्रसिद्ध असलेल्या ‘अँटोनी व्हील’ या बंगल्याच्या लाखो रुपयांच्या वीज बिलाबाबत त्यांनी माहिती खोदून काढत दिलेल्या बातमीने शोध पत्रकारीतेत दबदबा निर्माण केला आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकटमोचन ना.गिरीष महाजन यांच्या जमीन खरेदीची बातमी फोडून अश्या बातम्या लोकांपर्यंत पोहचवून सूर्यवंशींनी कोणत्याही दबावाशिवाय शोध पत्रकारिता जपलेली आहे. अमळनेर येथिल विप्रो कंपनी च्या कामगारांना आपल्या वृत्तपत्रिय लिखाणातून न्याय मिळवून दिला. सडेतोड, स्पष्ट आणि कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ते इंग्रजी दैनिकात पत्रकारीता करीत अमळनेरचाही नावलौकिक उंचावत आहेत. मुंबईत राहूनही सुधिर सूर्यवंशी यांनी इंग्रजी वृत्तपत्रीय माध्यमात काम करून आपला एक वेगळचा ठसा उमटवला आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आपले एक वेगळे वलय निर्माण केले आहे. म्हणूनच मोठ मोठ्या व्हीआयपी लोकांचा कंपू नेहमी त्यांच्या संपर्कात असतो.