अमळनेर तालुक्यातील बाम्हणे येथील काळीज पिळवटून टाकणारी घटना ; ग्रामस्थांच्या मदतीने आईवडील वाचले, पण मुलांचा दुर्दैवी मृत्यू
अमळनेर ( प्रतिनिधी) गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या झिमझीम पावसामुळे तालुक्यातील ब्राम्हणे येथील मातीचे घर भिजून जड झाल्याने शेजारील पत्र्याच्या शेडवर कोसळल्याची घटना ३१ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे या शेळमध्ये राहणारे संर्पूण पावरा कुटूंब ओल्यागच्च मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्यागेल्याने ग्रामस्थांच्या मदतीने पती-पत्नीला बाहेर काढले. मात्र त्यांच्या दोन कोवळ्या निष्पाप मुलांचा जीवगुदमरून मृ्त्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे.
अमळनेर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून झिमझिम पाऊस सुरू आहे. नागरिकांना सूर्यदशर्नही होत नाही आणि सततच्या रिपरिपमुळे मातीची घरे भिजून जड होत आहे. या सततच्या पावसामुळे बाम्हणे येथे शेतमजुरी करणारा पुना सदा पावरा हा पत्नी शांताबाई पावरा तसेच मुलगा जितेश व राहुल यांच्यासह पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेऊन राहत होते. या पत्र्याच्या शेडला लागूनच असलेले मातीचे घर हे झिमझिम पावसामुळे भिजून जड झाले होते. अखेर हे घर बुधवारी मध्यरात्री पावरा कुटुंब राहत असलेल्या पत्र्याच्या शेडवर पडले. शेडमध्ये शांत झोपलेले संपूर्ण पावरा कुटुंब यात दाबले गेले आणि चिमुकले कायमचे शांत झाले. भींत पडल्याचा जोराचा आवाज आणि आरडाओरड झाल्याने ग्रामस्थांनी शेडकडे धाव घेतली. यात धर्मराज पाटील, महेश पाटील, राजेंद्र पाटील, सरपंच प्रवीण पाटील, नितीन पाटील, संतोष पाटील, गुणवंत पाटील, प्रतीक पाटील, प्रकाश पाटील, नवल पाटील, किशोर पाटील यांनी पावरा कुटुंबाला बाहेर काढायला सुरुवात केली. मिळेल त्या साहित्याने गारा , लाकडे , काढून पावरा पती-पत्नीला बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र ओल्यागच्च मातीच्या मलब्यामुळे जीव गुदमरून जितेश व राहूल या दोन्ही मुलांचा जागीच मृत्य झाला होता. त्यांना उचलून घेतनाही ग्रामस्थांचे हात थरथरत होते. तर त्यांचे आईवडील मुलांना पाहून आक्रोश करीत होते आणि झालेल्या जखमांनी विवाहळत होते. ग्रामस्थांनी त्यांना कसेतरी बाहेर काढून प्रथम बेटावद येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र तेथे पुसेशा सुविधा नसल्याने जखमींना उपचारासाठी व अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात मुलांचे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले़. महेश पाटील यांच्या खबरीवरून मारवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
……………………
दीप अमावस्येलाच विझले दोन्ही दीप…..
भारतीय संस्कृतीत दीप अमावस्येला फार महत्त्व आहे. या अमावसेनंतर श्रावण महिना सुरू होऊन वैतवैकल्याला सुरुवात होते. यामुळे सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते. मात्र शेतमजुरी करणाऱ्या पावरा कुटुंबीयांसाठी दीप अमावस्येची रात्र काळरात्र ठरली. मातीच घर पडून झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या दोन्ही चिमुकल्यांचा मृ्त्यू झाल्याने क्षणार्धात त्यांचे दोन्ही दीप विझल्याने नातेवाइकांसह ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.