टंचाई परिस्थितीत पुरातन आडाला पुनर्जीवित करून फोडला पांझर, टँकरद्वारे प्रभागास होतोय पुरवठा..

नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचे प्रभागासाठी औंदार्य,दीड लाख खर्च करून विहीर पुनर्जीवित

अमळनेर-नगरसेवक असावा तर कसा याचे जिवंत उदाहरण प्रभाग क्र 1 चे नगरसेवक नरेंद्र विष्णू चौधरी हेच असुन त्यांनी दुष्काळात टंचाईची दाहकता लक्षात घेता आपल्या प्रभागातील अतिशय पुरातन असलेली मोठी विहीर सुमारे दीड लाख रु स्वतः खर्च करून जिवंत केली सुदैवाने तिला बऱ्यापैकी पांझर फुटल्याने दररोज तीन टँकरद्वारे संपूर्ण प्रभागास मोफत पाणीपुरवठा होत असून या कामगिरीचे नागरिकांत विशेष कौतुक होत आहे.


अत्यंत क्रियाशील व दातृत्ववान नगरसेवक म्हणून नरेंद्र चौधरी यांची ओळख असून प्रभागातील जनतेसाठी सदैव कार्यरत असणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे,यंदा तालुक्यात दुष्काळ असताना तापिमाई लोप पावल्याने जळोदचा डोह आटला,त्यापाठोपाठ इतर सोर्स देखील बंद होण्याच्या स्थितीत असल्याने नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी संभाव्य पाणी टंचाईचा धोका ओळखून प्रभागातील जनतेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे ठरविले त्याअनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून बंद व पूर्णपणे दुर्लक्षित असलेल्या विहिरीकडे त्यांची नजर गेली,प्रत्यक्षात बंगाली यांच्या विहिरीजवळ असलेली ही विहीर प्रताप मिल यांच्या मालकीची असून पूर्वी येथून प्रताप मिलला पाणीपुरवठा होत होता,मात्र मिल बंद पडल्यानंतर काळाच्या ओघात ही विहीर दुर्लक्षित होऊन मोठया प्रमाणात गाळ यात साचला होता,नगरसेवक चौधरी यांनी ही विहीर पुनर्जीवित करण्याचा चँग बांधून सुरवातीला संबंधितांकडून परवानगी मिळविली,त्यानंतर गाळ काढण्यासाठी क्रेन आणून मोठी यंत्रणा कामाला लागली,सुमारे आठ दिवस हे काम जोमाने सुरू होते,यासाठी असंख्य मजूर व प्रभागातील नागरिकांनी मेहनत घेतली,काम थांबू नये यासाठी नरेंद चौधरी हे अहोरात्र थांबून होते,यासाठी दीड लाखांच्या वर खर्च लागणार असताना ते मागे हटले नाहीत आणि सुदैवाने त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून या पुरातन विहिरीला पांझर फुटलाच.यानंतर जलपम्प बसवून पाणी उपसण्याची व्यवस्था करण्यात आली,याचाही खर्च चौधरी यांनीच केला.बऱ्यापैकी पाणी उपसा झाल्यानंतर आता या पाण्याचे शुद्धीकरण झाले असून दररोज 15 ते 18 टँकर पाण्याचा उपसा होत आहे.

संपूर्ण प्रभागात होतो टँकरद्वारे पुरवठा

अनपेक्षितपणे पुरातन विहिरीला पांझर फुटल्याने नरेंद्र चौधरी यांचा उत्साह द्विगुणित होऊन त्यांनी हे पाणी प्रभागातील प्रत्येकाच्या घरात पोहोचविण्याचा निर्णय घेतला,यासाठी स्वखर्चातुन तीन टँकर भाड्याने लावले दररोज सकाळपासून टँकर भरून प्रभागात टप्प्याटप्प्याने गल्ली बोळात हे टँकर उभे केले जात असून नागरिक अतिशय शिस्तीने नंबर लावून पाणी घेऊन जात आहे,तीन टँकरमुळे संपूर्ण प्रभाग कव्हर होत असून या प्रभागास लागून असलेल्या इतर प्रभागाचे नागरिक देखील याचा लाभ घेत आहेत,विशेष म्हणजे दररोज 15 ते 18 टँकर चा उपसा येथून होत असून टंचाई परिस्थितीत खंबीर साथ ही विहीर या प्रभागास देत आहे.

दैवानेच दिले,मी केवळ निमित्त-नरेंद्र चौधरी

यासंदर्भात नरेंद्र चौधरी यांनी बोलताना सांगितले की या पुरातन विहीरींतून पाणी मिळेल याचा विचार स्वप्नात देखील मी केला नव्हता परंतु प्रबळ इच्छाशक्ती आणि भगवंताची कृपा म्हणून तीला पांझर फुटला,यामुळे मी केवळ निमित्त असून ही दैवाचीच कृपा आहे,जे नागरिक मला मोठया विश्वासाने निवडून देतात त्यांच्यासाठी सदैव कार्यरत राहणे हे माझे कर्तव्य असुन ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे समाधान मला असल्याची भावना नरेंद्र चौधरी यांनी खबरीलाल शी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *