सावधान…… आपण मुलांचं बालपण विकताय शिक्षणाच्या बाजारात, तेही पैसे देऊन..?
माझा मराठीची बोलु कवतिकें | परि अमृतातेही पैजा जिंके | ऐसि अक्षरे रसिके | मेळविन ||
या ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे मराठी कितीही भाषा गोड अविट असली तरी तिच्याकडे शहरी पालकांचंच नाही तर खेड्यातील अशिक्षित पालकांचंसुध्दा दूर्लक्ष होताना दिसतंय आणि इंग्रजीकडे त्यांचा कल वाढलेला दिसतोय. मला जे मिळालं नाही ते ते मी माझ्या पाल्याला देईन व त्याला सर्वांपेक्षा सरस ठरविन असे अप्रत्यक्ष शर्यत पालकांतच आपणाला बघायला मिळत आहे. या शर्यतीची रूपरेषा पालक वर्ग मुल गर्भात असतानाच ठरवतात. आपला बाळ अमुक अमुक इंग्रजी शाळेत शिकेन. त्याला आपण अमुक अमुक प्ले गृपलाच टाकू. असेना “फि” कितीही…कमवतोय कुणासाठी..? बाळासाठीच ना..?
कुठलाही पालक म्हटला तरी त्याच्या नजरेसमोर पहिला प्रश्न असतो तो त्याच्या पाल्याच्या शिक्षणाचा. साहजिकच आहे, असायलाही हवाच. परंतु हा शिक्षणाचा प्रश्न डोळ्यासमोर असताना त्यांचा शिक्षणाविषयी प्राथमिक दृष्टिकोनही तयार असतो. “शिक्षण इंग्रजी मधूनच द्यायचं. स्पर्धेचं युग आहे तो यात टिकला पाहिजे. त्याची मराठी कमजोर असली तरी त्याला गणित , विज्ञानाबरोबरच इंग्रजीसुध्दा अस्खलित यायलाच हवी. तसंही मराठी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. आपल्या बाळाच्या प्रगतीला मर्यादा नसाव्यात. त्याला फिनिक्स पक्षासारखी उडाण घ्यायची आहे.” असे स्वप्न तो पालक बाळ जन्माला आल्यापासुनच बघत असतो. जन्माला आलेला बाळ जसा पहिलं पाऊल टाकतो तेव्हा त्याचं दुसरं पाऊल लगेचच शाळेत पडावं असं पालकांना वाटतं.

बाळ जरा का चालायला, एक दोन बोबळे शब्द बोलायला लागला रे लागला तोच त्याच्या पुढ्यात ठेवला जातो त्याचा यंत्र-गुरू “मोबाईल.” तो त्याला रोज कित्तेक तास वन टू थ्री शिकवत असतो, इंग्रजी कविता (पोयम) शिकवत असतो. अचेतन मनाला विवेक कळत नाही. तर यंत्राला मन. परंतु या मोबाईचे दुरूपयोग पालकांना लक्षात येण्याच्या आत मोबाईलने मुलांना गुलाम बनवलेले असते. असो. परंतु कुठलाही पालक त्याला मराठीतील एक दोन तिन नाही शिकवत आणि वरून कारणं देताना म्हणतात “जमाना गेलाय एका दोनाचा आता इंग्रजीचा आहे. जग जवळ येत आहे. इंग्रजी ग्लोबल लॕग्वेज आहे. वन टू थ्री च शिकवावे लागेल.” पालकांचा या मागचा मूळ दृष्टिकोन आपल्या पाल्याची प्रगती हाच आहे यात दुमत मुळीच नाही. परंतु आपण पालक म्हणून थोडं चुकतोय का? आपण आपल्या लहानपणी कसे होतो? आपल्या लहानपणी कुठल्या शाळा होत्या ? आपण काय शिकलो? आपली प्रगती कशी झाली? आपल्या प्रगतीसाठी आपले आईवडील कसे झटले होते? या भूतकाळाचे अवलोकनसुध्दा त्यांनी एकदा करायला हवे. आणि आपल्या आशा आकांक्षांच्या ओझ्याखाली आपला बाळ त्याचं बालपण यांची गळचेपी तर होत नाही ना ? याचीही जाणीव ठेवावी.

“मराठी शाळा की इंग्रजी शाळा” हा विषय पालकांसाठी अतिशय महत्वाचा आहे. दुर्दैवाने या दोन्ही शाळांमागिल शिक्षणाचा उद्देश मात्र कुठंतरी हरवलेला आपणाला दिसतो.
“शाळा आहेत पण व्यवहारज्ञान नाही.
शिक्षक आहेत पण गुरू नाही.
शिक्षण आहे पण ज्ञान नाही.”
अशी दडभद्री परिस्थिती आपणांस आज शाळांची बघायला मिळते. पालक आपल्या पाल्याला तो या स्पर्धेच्या युगात टिकावा म्हणून त्याला दिड-दोन-तिन वर्षाचा होताच त्याला प्ले-गृपला टाकतात. नर्सरीला टाकतात. स्वतःच या पाश्चात्त्य संस्कृतीची शिकार झालेल्या शाळांची असलेली पंधरा वीस हजार रूपये फी भरून आपल्या पाल्याचे बालपण शिक्षणाच्या प्रतिष्ठित बाजारात विकतात. ही भरघोस फी जेव्हा सरकारी नोकर वर्ग भरतो तेव्हा एवढे आश्चर्य वाटत नाही आश्चर्य तेव्हा वाटते जेव्हा ही फी जेमतेम मोलमजुरी करून वर्षानुवर्षे पैसा गोळा करून एक सामान्य गरीब हजारोंनी या प्ले-गृप व नर्सरीच्या काऊंटरवर एका दमात भरतात. त्यांच्या मनातील शिक्षणाविषयीची तळमळ आपण समजू शकतो पण एवढे हजारोंनी पैसे भरून आपल्या पाल्याला तेवढं दर्जेदार शिक्षण , संगोपन तेथे मिळते की नाही यावरही त्यांची नजर असावी. केवळ ज्या प्ले-गृप ला आपल्या पाल्याला घातले, ज्या नर्सरीला आपल्या पाल्याला घातले त्या शाळेचे नाव खूप मोठे अथवा नावाजलेले आहे म्हणून तिथल्या शिक्षणाच्या दर्जाकडे जे सर्वसाधारण दुर्लक्ष केले जाते ते न करता या शाळांचा मुळ दृष्टिकोन तसेच तुमची एवढी आरोमाप फी भरण्यामागचा शिक्षणाचा उद्देश त्या शाळांच्या भल्यामोठ्या इमारतीमध्ये, चकचकीत टाईल्समध्ये, पाश्चिमात्यांचा प्रभाव असलेल्या ड्रेसकोडमध्ये, ग्राऊंडमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या रंगीबेरंगी खेळण्यांमध्ये तसेच देखण्या, सुंदर शिक्षीकांमध्ये हरवायला नको. क्रमशः……..
पुढील भागात उद्या…
लेखक- सुधीर त्र्यें. पाटील