अमळनेर (प्रतिनिधी) श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड पथकाने त्यांना सॅल्यूट व टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
या वेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या, ८१ वर्षांची वाटचाल म्हणजे एक गौरवशाली परंपरा आहे. ही शाळा केवळ शिक्षणसंस्था नसून संस्कारांची पाठशाळा आहे,” असे सांगून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रॅलीची सुरुवात शाळेपासून झाली व ती महाराणा प्रताप चौक, बस स्टँड, तिरंगा चौक, कोंबडी बाजार, सुभाष चौक, स्वामी नारायण मंदिर, पोस्ट ऑफिस मार्गे शाळेत परत आली. रॅलीत विविध सामाजिक संदेश देणारे सादरीकरण करण्यात आले. रॅलीच्या प्रारंभी घोड्यावर आरूढ भारतमाता, त्यामागे सैनिक, स्काऊट-गाईड पथक, आणि विद्यार्थीनींनी साकारलेले द्रौपदीबाई, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, सावित्रीबाई, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सईबाई, वारकरी, अष्टप्रधान मंडळ आदींच्या वेशभूषेने उपस्थितांचे मन जिंकले. या शोभायात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्याध्यक्ष डॉ. संदीप गुजराथी, चेअरमन नीरज अग्रवाल, हरीअण्णा वाणी, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, पराग पाटील, डॉ. ए. बी. जैन, तसेच मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षिका एस. पी. बाविस्कर, शिक्षक प्रतिनिधी डी. एन. पालवे, एस. एस. माळी, आर. एस. सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीदरम्यान विविध चौकांमध्ये जागृती
रॅलीदरम्यान विविध चौकांमध्ये महिला साक्षरता, महिला सबलीकरण, मतदान जागृती आणि करुणा संदेश या विषयांवरील नाटिका विद्यार्थिनींनी सादर केल्या. लेझीम पथक, वारकऱ्यांची दिंडी, टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामस्मरण, या सर्वाने रॅलीला एक अध्यात्मिक आणि उत्सवी स्वरूप दिले.