अमळनेर (प्रतिनिधी) आंब्यांचा बहार संपला असला तरी श्री मंगळ ग्रह मंदिर परिसरात असलेल्या झाडांना चक्क एकाच देठाला चार कैऱ्या लगडल्या आहेत.
आंब्याच्या फांद्यावरील देठाला प्रत्येकी एक कैरी लगडलेली आपण सर्वत्र आणि नेहमीच पाहतो. मात्र एकाच देठाला चक्क चार कैऱ्या लगडल्याची किमया घडली आहे श्री मंगळ ग्रह मंदिरात. तेथील आंब्याच्या झाडावरील फांदीच्या देठाला चार कैऱ्या त्याही मोठ्या आकारात लगडल्या आहेत. देवाची करणी अन् नारळात पाणी या उक्तीसारखी काहीशी अनुभूती श्री मंगळग्रह मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना या एकाच देठावरील चार कैऱ्या पाहून येत आहे. साधारणत: फेब्रुवारी, मार्चपासून आंब्याचा मोहोर खुलायला सुरूवात होते. त्यापासून बनणाऱ्या कैऱ्या तथा आंबे अक्षयतृतियेच्या आधी पासून उपलब्ध होतात. महाराष्ट्रात सरत्या जून अखेरपर्यंत हापुस आंबा सोडून विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांना आंबे लागतात. जुलैत मात्र राज्यात कोणत्याही प्रकारच्या कैऱ्या किंवा आंबा सहसा आढळत नाही. देशातील काही भागात मात्र जवळपास वर्षभर उपलब्ध होणाऱ्या आंब्यांच्या विशिष्ट प्रकारची झाडे आहेत. श्री मंगळग्रह मंदिर परिसरात लावलेल्या आंब्याच्या झाडाच्या आताही भरपूर कैऱ्या लगडलेल्या आहेत. हे पाहून श्री मंगळग्रह मंदिरात येणारे भाविक आचंबित होतात. श्री मंगळग्रह मंदिर परिसरातचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आंब्यासह विविध फळांची अनेक झाडे आहेत. त्यांना येणारी सर्व फळे ही केवळ आणि केवळ मंदिर परिसरात वास्तव्य करणाऱ्या विविध प्रकारच्या शेकडो पक्ष्यांची भूक भावगवण्यासाठीच असतात. ही फळे तोडण्याची कुणालाही परवानगी नाही, असे मंदिर संस्थांनाच्या पदाधिकाऱ्यांनी संगितले.