आमदार अनिल पाटील यांनी मुख्याधिकारींना दिल्या सूचना
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहराच्या विकासाला महत्वपूर्ण ठरणारा ऐंशी फुटी रिंग रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आमदार अनिल पाटील यांनी या रस्त्याचे ठेकेदारांना व मुख्याधिकारी नेरकर यांना कामाबाबत कडक सूचना दिल्या आहेत. काम सुरू करा अन्यथा ठेकेदार बदलवा अशी तंबी ही त्यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या चार महिन्यापासून 80 फुटी रोडच्या कामासाठी रस्ता खोदून पाईप लाईन वारंवार फोडणे सूरू आहे. संबंधित ठेकेदाराच्या भोंगळ मनमानी तसेच नियोजन शून्य कारभारामुळे मुंदडा नगर पाण्याच्या टाकीचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे तर 10 ते 12 दिवसांनी गढूळ दुर्गंधी युक्त होतोय. या कामाबाबत वारंवार तक्रारी आमदार अनिल पाटील यांच्याकडे आल्याने त्यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, माजी नगरसेवक, पत्रकार यांच्याशी चर्चा केली.
शहराला जोडणारा या डीपी रस्त्याचे काम गलवाडे – बेटावद, मांडळ, धुळे रस्त्याकडून मुंदडा नगरपर्यंत हा रस्ता तयार केला जाणार आहे. सद्य स्थितीत मुंदडा नगर एक भागात गेल्या चार महिन्यापासून रस्ता कोरला जाऊन खडी टाकलेली आहे. मात्र त्यानंतर राम नगर पासून रस्त्याचे काम थांबलेले असून राम नगर मुंदडा नगर, सोनार नगर, ड्रीम सिटी, कलागुरु नगर, विराज पार्क, आदी भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास गेल्या चार महिन्यापासून सहन करावा लागत आहे. रस्त्यावर खडी असल्याने पायी चालता येत नाही. नगरपरिषद प्रशासन, बांधकाम विभाग व मुख्याधिकारी देखील ठेकेदारांना समज देत नसल्याने अखेर आमदारांनी याची दखल घेतली.
गेल्या चार महिन्यापासून रखडलेल्या या रस्त्याच्या ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असून पालिका प्रशासन देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत नाहीत. नागरिकांच्या तक्रारी आल्याने दि. 21 रोजी आमदार अनिल पाटील यांनी संबंधित ठेकेदार पप्पू पहाडे, उमेश शहा यांना कडक सूचना देत आठ दिवसात कामाला सुरुवात करा अन्यथा तुमच्याने काम होत नसेल तर दुसऱ्या ठेकेदाराला काम द्या अशी समज दिली असून मुख्याधिकारी यांना देखील सूचना केल्या आहेत.