स्वच्छ सर्वेक्षण अमळनेर नगरपालिका जिल्यात प्रथम क्रमांकावर

अमळनेर (प्रतिनिधी) स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेने १२५०० पैकी ९००३ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

गेल्यावर्षीही अमळनेर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. यंदाच्या सर्वेक्षणात नगर परिषदेने चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा अमळनेर शहराच्या शिरचेपात मानाचा तुरा रोवला आहे.

देशपातळीवर केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाकडून दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या हे अभियान फक्त नगरपरिषद व शासकीय यंत्रणांपुरतेच मर्यादित राहू नये, तर त्यात नागरिकांचाही सहभाग असावा यासाठी स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. यासाठी नगरपरिषदांना विविध घटक ठरवून देण्यात आले आहेत. नगरपरिषदांनी केलेल्या कामगिरीनुसार त्यांना स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक दिला जातो. अमळनेर येथील स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चा निकाल १७ जुलै२०२५ रोजी जाहीर झाला. त्यात अमळनेर शहर जिल्ह्यात प्रथम, तर ५० हजार ते ३ लक्ष लोकसंख्या गटात – नाशिक विभागात ४ थ्या स्थानावर, राज्यात १७ व्या स्थानावर तर स्वच्छ शहरांमधून अमळनेर नगरपरिषदेस देशाच्या ५० हजार ते ३ लक्ष लोकसंख्या गटात ११० व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अमळनेर शहरातील सर्व नागरिकांचे, नगर परिषद स्वच्छता विभागातील स्वच्छता निरिक्षक व सफाई कर्मचाऱ्यांसह स्वच्छ सर्वेक्षणासाठी मेहनत घेणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अमळनेर पालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात निरंतर कामगिरीचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे शहरवासीयांनी देखील जास्तीत जास्त स्वच्छतेच्या सवयी अंगीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये असे मिळवले गुण

 

स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत सर्टिफिकेशन, सव्हींस लेव्हल प्रोग्रेस हे घटक असून एकूण १२५०० गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आलेली होती. सर्टिफिकेशन या घटकात हागणदारीमुक्त शहर (ओपन डिफेकेशन फ्री सिटी) व कचरामुक्त शहर मानांकन (गरबेज फ्री सिटी) वर गुण दिले जातात. यात अमळनेर पालिकेला २५०० पैकी  हागणदारीमुक्त शहर (ओपन डिफेकेशन फ्री सिटी) मानांकनात १००० गुण मिळाले आहेत. सिटिजन व्हॉइस प्रकारात पालिकेने केलेली जनजागृती, प्रतिक्रिया आदींचा समावेश असतो. तर सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमध्ये एकूण १०,००० गुणांसाठी स्वच्छता अभियानांतर्गत केलेल्या कामांच्या कागदपत्रांच्या व प्रत्यक्ष पाहणीचा समावेश असतो. त्यात पालिकेने १०,००० पैकी ८००३ गुण मिळवले असल्याने त्यामुळे यंदाच्या सर्वेक्षणाला पालिकेचे मानांकन सुधारले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *