संसद भारती पुरस्काराने खासदार स्मिताताई वाघ सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) “सी एस आर टाईम्स” या संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा “संसद भारती पुरस्कार २०२५”  खासदार स्मिताताई वाघ यांना प्रदान करुन सन्मानित करण्यात आला.

लोकसभेतील उल्लेखनीय कार्याची आणि मतदारसंघात केलेल्या सामाजिक योगदानाची दखल घेत संस्थेतर्फे हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्याचा प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आणि स्मरणीय होता. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या १२ व्या राष्ट्रीय सी. एस .आर. संमेलनात हा कार्यक्रम झाला. “विकसित भारत मिशन २०४७ मध्ये सीएसआरची भूमिका” या विषयावर आधारित या संमेलनात देशभरातील धोरणकर्ते, उद्योजक, सी एस आर क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य असे की,  सीएसआर टाईम्स” या संस्थेने “संसद भारती पुरस्कार” प्रथमच राजकीय क्षेत्रातील व्यक्तीला प्रदान केला आहे.  विशेषतः, संसदेमध्ये थेट निवडून आलेल्या एका महिला खासदारास हा सन्मान दिला गेला आहे. या पुरस्कारासाठी संसदेमधील सक्रिय सहभाग, लोकप्रतिनिधी म्हणून बजावलेली भूमिका, आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याची सखोल दखल घेऊन हा पुरस्कार  श्रीमती वाघ यांना प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर मान्यवर,धोरणकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांचाही सन्मान करण्यात आला.

जनतेचा आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाचे फळ : स्मिता वाघ

 

एस आर टाईम्स” संस्थेच्या या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानते. हा पुरस्कार माझ्या मतदारसंघातील जनतेच्या विश्वासामुळे आणि सहकाऱ्यांच्या अखंड सहकार्यामुळेच  तसेच वेळोवेळी नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शक्य झाला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शहा,भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय,अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि जलसंपदा मंत्री संकटमोचक  गिरीजी महाजन या सर्व नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि या सन्मानप्राप्तीच्या मार्गावर मला सातत्याने प्रेरणा, मार्गदर्शन आणि विश्वास दर्शवला त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. अश्या भावना पुरस्कार स्विकारताना खासदार स्मिता ताई वाघ यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *