मंगरुळ येथील शेतकऱ्याने पुराव्यासह जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे केली तक्रार
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा खरेदी करताना आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे अशा लुट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंगरुळ येथील शेतकऱ्याने पुराव्यासह जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगरुळ येथील शेतकरी रतीलाल रघुनाथ पाटील यांनी ९ रोजी शिरुड येथील श्री. गुरुदत्त कृपा कृषी सेवा केंद्र येथून विशिष्ट कृषी निविष्ठा खरेदी केली. त्याची किंमत त्यांना १५८० रुपये आकारण्यात आली. दोन दिवसांनी दुसऱ्या एका कृषी सेवा केंद्रावर तीच निविष्ठा ११००/- रुपयात उपलब्ध असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पहिल्या कृषी केंद्राने त्यांच्याकडून ४८० रुपये जास्तीचे घेत फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अधिकृत पावतीसह जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली आहे. या जादा दराने कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांची चौकशी करावी, दोषी आढळल्यास त्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द करावा, तसेच तालुक्यातील कृषी केंद्रांची दरसूची व प्रत्यक्ष विक्री किंमत तपासावी अश्या मागण्या या तक्रारीत करण्यात आल्या आहेत.
कृषी विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
रतीलाल पाटील यांच्याबाबतीत घडलेला प्रकार एकमेव नसून अनेक शेतकऱ्यांची तालुक्यात लूट सुरू आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन अनधिकृत नफा कमावणे सुरू असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. मागे जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी रविवारी भेट देऊन कृषी केंद्रांची तपासणी केली होती. मात्र लेखी नोटीस न देता तोंडी तंबी देऊन त्यांना सोडून दिले होते. तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला तर याबाबत काहीच देणेघेणे नसून वरिष्ठ अधिकारीच निष्क्रीय असल्याने कर्मचारी ही सुस्तावले आहेत. त्यामुळे शेतकरी आता जिल्हा स्तरावर तक्रार करत असल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची निष्क्रियता समोर आली आहे. आता जिल्हा स्तरावरूनच धडक तपासणी मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.