अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बांधकाम मजुरांना घरगुती भांडे घेण्यासाठी १५ रोजी मंगरूळ येथील कोल्डस्टोरेज येथे बोलावले होते. परंतु तेथे सकाली ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणीही आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा मजुरांची फसवणूक झाली. तर या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नसल्याने भांडे घेण्यासाठी आलेल्यांना पावसाचा, चिखलाचा समाना करावा लागला. त्यामुळे यंत्रणेविषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम मजुरांना घरगुती साहित्याची योजना अंमलात आणली गेली आहे. यापूर्वी मजुरांना संबंधित ठेकेदार भडगाव, पारोळा, अमळनेर अशा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत होते. त्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ होत होता. गर्दी, नंबर मागे पुढे, ठेकेदार उशिरा येणे, न येणे, मजुरांचे आपसात भांडणे यामुळे अनेकदा वाटप बंद करावी लागली. त्यात काही दलालांनी पैसे उकळून नंबर मागे पुढे करून घोळ केला होता. यावर उपाययोजना म्हणून शासनाने नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन सुरू करून भांडी वाटप दिनांक आणि स्थळ ग्राहकाला ऑनलाइन आदेश दिले जातात. अनेक सेतू चालकांनी बांधकाम मजुरांची नोंदणी करताना ५०० रुपये उकळले. अनेक नागरिकांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाच्या सचिवांचे पत्र प्राप्त झाले असून भांडे घेण्यासाठी १५ रोजी कार्यालयीन वेळेत तालुक्यातील मंगरूळ येथील शिरूड रस्त्याच्या बाजूला अमळनेर कोल्ड स्टोरेज येथे बोलावले होते. कार्यालयीन वेळ सांगितल्यानंतर देखील सकाळी ११ ते ३ पर्यंत दिलेल्या जागेवर कोणीच नव्हते. त्यामुळे अमळनेर तालुक्यातवून विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांची घोर फसवणूक झाली. मजुरांनी प्रांत कार्यालय गाठले. प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी हा प्रश्न त्यांच्या अखत्यारीतील नसला तरी त्यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला असता सर्व फोन बंद होते. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ठेकेदार रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क केल्यावर त्याने तीन वाजेनंतर वाटप सुरू करू असे प्रांत मुंडावरे यांना सांगितले.
ठेकेदाराचा भ्रमणध्वनीही नंतर बंद
एक तास वाट बघा मी प्रयत्न करतो असे ठेकेदाराने सांगून काही वेळात त्याचा भ्रणध्वनीही बंद केला. घटनास्थळी थांबायला सोय नव्हती काही महिला एका शेड खाली थांबल्या होत्या. मधूनच पाऊस सुरू होत असल्याने मजुरांचे हाल होत होते. अनेक जण खेड्याबरून भाड्याने गाड्या व रिक्षा करून आले होते. काही जण आपल्या लहान मुलांना घरी एकटे टाकून आले होते. बांधकाम मजुरांना भांडी वाटप योजनेचा आधीच बोजवारा उडाला आहे. शासनाने योजना अंमलात आणताना योग्य नियोजन करावे. गरीब मजुरांची थट्टा करू नये अशी मागणी होत आहे.
कोणतीही गाईड लाईन नाही
मजुरांना ऑनलाइन वेळापत्रक दिले असले तरी मला त्याबाबत कोणतीही गाईड लाईन नाही. मी संबंधित साईटवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र संपर्क होत नाही.
–रवींद्र ठाकरे , भांडी वाटप ठेकेदार