अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या १३ वर्षांपासून सक्तीने वसूल करण्यात येणारी लोकवर्गणी रद्द करा आणि जळगाव महापालिकेच्या तुलनेत १४ टक्के जादाचा नपा शिक्षण कर कमी करा अशी आक्रमक भूमिका अमळनेरकरानी दुसऱ्या दिवशी पालिकेत धडक देत घेतली. त्यावर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी हे सर्व कर आधी झालेल्या ठरावानुसार असून ते कमी करता येतील का याबाबत कायदेशीर बाबी तपासून जनहिताचे निर्णय घेतले, जातील असे आश्वासन दिले.
मालमत्ता कर वाढी संदर्भात अमळनेर शहर व पत्रकार संघाच्या वतीने रविवारी सहविचार सभा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार संघाच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी बांधव आणि मालमत्ताधारक मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सकाळी ११ वाजता पालिकेत पोहोचले असता तत्पूर्वी पत्रकार संघाच्या विनंती नुसार मुख्याधिकारी नेरकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालिका सभागृहात बैठक घेतली. या वेळी उपमुख्याधिकारी चव्हाण व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी संजय पाटील यांनी जळगाव व अमळनेर येथील करात असलेली मोठी तफावत मांडत सहविचार सभेच्या मागणीनुसार अमरावती येथील संस्थेस दिलेला सर्वेक्षणचा ठेका रद्द करून कर वाढ रद्द करण्याची मागणी केली. प्रशांत निकम यांनी मालमत्ता हस्तांतरण साठी २ टक्के मूल्य कमी करा, लोकवर्गणी शून्य करा, अन्यथा जनहित याचिका दाखल करण्याचे संकेत दिले. अनंत निकम यांनी ठेका दिलेल्या खाजगी संस्थेस डीनाईड करून शिक्षण कर कमी करा अशी मागणी करत इतर मुद्दे उपस्थित केले. अनिल कासार यांनी हायकोर्टाच्या निकालानुसार सर्वांचींच लोकवर्गणी माफ करा, अशी मागणी केली. चेतन राजपूत यांनी नव्या मालमत्ता धारकांना नोटीस मग संबंधित संस्थेने जुन्या मालमत्ताची मोजणी का केली, असा प्रश्न उपस्थित केला. माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी नगरसेवक मनोज पाटील, अरुण भावसार, रणजित शिंदे, राजू फाफोरेकर, सुनिल शिंपी, आर. ए. पाटील यासह अनेकांनी पाणीपट्टीवर आकारली जाणारी २ टक्के शास्ती, वाढीव मालमत्ता कर रद्द करणे यासारखे अनेक मुद्दे उपस्थित करत न्याय देण्याची मागणी केली. यानंतर मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या बैठकीत अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष आर. जे. पाटील, खबरीलालचे संपादक तथा सचिव जितेंद्र ठाकूर, संदीप पाटील, मुन्ना शेख, अबीद शेख तसेच अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन रणजीत शिंदे, पंकज चौधरी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, बाळासाहेब संदानशिव, गोपी कासार, राजू पाटील, महेश कोठावदे, प्रशांत निकम, नरेंद्र संदानशिव, उमेश वाल्हे,लोटन पाटील, मनोज शिंगाणे, अनंत निकम, साहेबराव पाटील, शरद पाटील, गोविंदा बाविस्कर, नावेद शेख, सुनील शिंपी, मनीष विसपुते, नरेंद्र अहिरराव, राजू बडगुजर, महेश चौधरी, राहुल कंजर, रणजीत नाना राजपूत, विपुल पाटील, चेतन बोरसे, भगवान काळे, राजमल पाटील,हरीश वासवानी, नवीद शेख, जयवंतराव पवार, नईम पठाण, जितेंद्र देशमुख, विठ्ठल पाटील, जी. एम.पवार, पंकज साळी, भीला पाटील, प्रल्हाद पाटील, संदेश मणियार, भटू मराठे, सुरेश वाघ, अनिल ठाकूर, बाळासाहेब बोरसे, अनिल कोठारी, गणेश जाधव, मुकेश शहा,संजय पाटील यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
समाधानकारक निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहील : तुषार नेरकर
या बैठकीत उत्तर देताना मुख्याधिकारी तुषार नेरकर म्हणाले की शहरात २३ हजार मालमत्ताधारक आहे, आता जे कराच्या कक्षेत नाहीत अशा ४१८७ मालमत्ता धारकानाच नोटीस दिली असून यात कोणतीही दुकान भाडे अथवा करवाढ नाही, सर्व जुन्या बॉडीच्या ठरावानुसारच कर लावले आहेत. आपली हरकत आल्यावर संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेईल. मालमत्ता हस्तांतरण २ टक्के कर जास्त वाटत असला तरी हा देखील जुन्या बॉडीचा ठराव असून यासंदर्भात देखील कायदेशीर बाबी तपासून कमी करण्याचा प्रयत्न करू, नप शिक्षण कर कमी करण्यासाठी देखील कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ, पार्किंग, कच्चे शेड किंवा अपूर्ण बांधकाम बाबत कर लावला असल्यास हरकती घ्याव्यात. तसेच पाणीपट्टी वर २ टक्के शास्ती व लोकवर्गणी बाबत सर्व जुने ठराव तपासून त्याबाबत निर्णय घेऊ आणि निवडणुकिनंतर येणाऱ्या कौन्सिलच्या पहिल्याच सभेत काही अन्यायकारक ठराव रद्द करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी देत अनेक प्रश्नांवर समर्पक उत्तरे दिलीत. यानंतर सहविचार सभेच्या मागणीवर आठ दिवसात उचित निर्णय घेण्याबाबत पत्रकार संघास लेखी पत्र पालिकेच्या वतीने देण्यात आले.