अमळनेर (प्रतिनिधी) येथील गंगाराम सखाराम (जीएस) हायस्कूलच्या १९७५ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळावा अतिशय उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थितांनी आठवणींना उजाळा दिला. दोन दिवस हा कुटुंबिक स्नेहमेळावा रंगला.मेळाव्याची सुरुवात १२ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली.या बॅचच्या अनेक विद्यार्थी विविध भागांत विखुरलेले असूनही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून या समारंभासाठी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे हा सपत्नीक मेळावा होता आणि एकूण ४५ विद्यार्थी व त्यांच्या पत्नी मिळून ९० जण सहभागी झाले. प्रारंभी दिवंगत सहाध्यायींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ओळख परेड, कुटुंबीयांची माहिती, जीवनप्रवासातील अनुभव आणि शालेय आठवणींनी भरलेला संवाद झाला. काही विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनंतर प्रथमच भेटले होते, त्यामुळे क्षण भावनांनी ओथंबून गेले. संध्याकाळी पार पडलेल्या संगीत रजनी कार्यक्रमात ‘किशोर चंद्र’ ऑर्केस्ट्राने वातावरण सादर करत आठवणींना गोड स्वरांनी उजाळा दिला. या वेळी प्रविण गुरुजन डी. वी. वाणी, जी. पी. कुलकर्णी व एच. टी. नंदवे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी, आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला. दुसऱ्या दिवशी १३ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता समूह छायाचित्र घेण्यात आले. त्यानंतर श्री वाडी संस्थान समाधी परिसराचा हेरिटेज वॉक घेण्यात आला. पुजारी जय विकास देव यांनी परिसराचा इतिहास अत्यंत रसपूर्ण पद्धतीने उलगडून सांगितला.
यानंतर सर्वांनी जीएस हायस्कूलला भेट दिली. मुख्याध्यापक विनोद कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जुन्या दहावीच्या वर्गात बसून शिक्षक कुलकर्णी यांनी ‘फ्रेंच राज्यक्रांती’वर वर्ग घेतला, ज्यामुळे उपस्थित सर्वांनी पुन्हा एकदा शालेय जीवन अनुभवले. यावेळी शिक्षक नंदवे देखील उपस्थित होते. यानंतर प्रताप महाविद्यालय, साने गुरुजी स्मारक व प्रताप तत्वज्ञान मंदिराला भेट देण्यात आली. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, प्राचार्य कोचर, डॉ. संदेश गुजराती, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, हरी वाणी, आणि डॉ. एस. डी. ओसवाल, प्रा. सुधीर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेच्या सभागृहात डॉ. संजय कळमकर यांचे ‘जीवनातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर प्रभावी व्याख्यान झाले. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या दोन दिवसीय मैत्री आणि आठवणींनी भरलेल्या स्नेहमेळाव्याचा समारोप मंगळ ग्रह मंदिर परिसरातील भेट व आरतीने झाला.