शालेय परिसरात परसबाग उभारणीसाठी जिल्हा तालुकास्तरावर होणार स्पर्धा

अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरता स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदंर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत. प्रस्तुत योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून राज्यामध्ये उत्कृष्ठ परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात येत असून सर्व शाळा, शिक्षक व पालकांच्या सहकार्याने राज्यामधील सुमारे ६८७०४ शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत.

यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पसरबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय शासनाने संदर्भाधीन शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला असून राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार उपक्रमाकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक / पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था, सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेणे आवश्याक आहे. या परसबाग स्पर्धेचे मुल्यांकन करण्यासाठी शिक्षण, कृषी, आरोग्य विभागात्तील अधिकारी तसेच, आहारतज्ञ व स्थानिक प्रगतीशील शेतकरी यांची समिती गठीत करण्याचे सांगण्यात आले आहे. उत्कृष्ट परसबागांचे मुल्यांकन करण्यासाठी निकष ठरविण्यात आले असून त्यांना गुणांकन देण्यात आले आहे. तालुका स्तरावरील स्पर्धेचे मूल्यांकन करुन ऑक्टोबर, २०२५ अखेर तालुका स्तरीय विजेल्या शाळांची नावे संबंधित गटशिक्षणाधिकारी/अधिक्षक (शापोआ) यांनी घोषित करुन जिल्ह्यास कळवावी लागणार आहेत. तसेच, तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या शाळेतील परसबागेची तपासणी करून जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल नोव्हेंबर, २०२५ अखेर जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची राहणार आहे. सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर शाळांनां आवश्यक त्या सविस्तर सूचना निर्गमित करून, शाळास्तरावर परसबाग निर्मिती करताना २५ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्यांचे पालन करण्याचे सांगितले आहे. जेणेकरुन शाळास्तरावर बहुविध स्वरुपाची परसगाब विकसित करता येऊ शकेल. नागरी भागातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात परसबाग विकसित करण्याकरीता संबंधित महानगरपालिकांचे प्रशासन अधिकारी यांनाही आवश्यक कार्यवाही करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद शंकरगिरी गोसावी यांनी हे आदेश काढले आहेत.

 

उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरीता बक्षिस

 

तालुकास्तरावर  प्रथम क्रमांक ११००० रुपये, व्दितीय क्रमांक  ८००० रुपये, तृतीय क्रमांक्र ५००० रुपये, प्रोत्साहनपर प्रत्येकी ३ शाळांना २००० रुपये. तालुस्तरावर असे एकूण ३० हजारांची बक्षिसे आहेत. तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक २१००० रुपये, व्दितीय क्रमांक १५००० रुपये, तृतीय क्रमांक्र ११००० रुपये, प्रोत्साहनपर प्रत्येकी ३ शाळांना  ३००० रुपये याप्रमाणे एकूण ५६ हजारांची बक्षिसे आहेत.

असे होणार मुल्यांकन

 

परसबागेची रचना/आराखडा एकूण (१० गुण), हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड (२०गुण), परसबागेचे व्यवस्थापन (२५ गुण), विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग( २० गुण), उत्पादीत भाजीपाल्यांचा आहारामधील समावेश (१० गुण), परसबागेतील भाज्यांची विक्री (५ गुण), सामाजिक संस्था यांचे परसबाग उभारणीतील योगदान (५ गुण), शाळेमध्ये ईसीओ- क्लबची स्थापना व त्याअंतर्गत राबविलेले उपक्रम (५ गुण), अशा एकूण १०० गुणांचा यात समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *