अमळनेरात घरासमोरून चोरी झालेल्या कारच्या शोधासाठी गेले होते पथक
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात चोरीस गेलेल्या कारच्या तपासासाठी मध्य प्रदेशात गेलेल्या अमळनेर पोलिसांच्या पथकास बाहेर गावाहून चोरीस गेलेल्या दोन कार हाती लागल्या आहेत. या कार ताब्यात घेऊन अमळनेरात आणण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि.24 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास अमळनेर शहरातील ओमसाई श्रध्दा नगर येथील प्रविण हरिश्चंद्र ठाकुर यांच्या मालकीची 1,50,000 रुपये किमतीची एक पर्पल पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची डिझायर न्यू व्हीडीआय मॉडेलची चारचाकी गाडी घरासमोरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने अमळनेर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाचे तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय माहितीच्या आधारावर डीवायएसपी विनायक कोते यांचे सुचनांप्रमाणे वाहनाच्या तपासकामी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मागदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन मधील गुन्हे अन्वेषण पथकाचे पो.उप.नि. शरद बागल, पो.उप.नि नामदेव आनंदा बोरकर, पो.शी विनोद किरण संदानशिव, प्रशांत विजय पाटील, निलेश सुभाष मोरे, उज्वलकुमार बुधा म्हस्के व उदय बोरसे यांना 6 जुलै रोजी मध्य प्रदेशात रवाना केले. त्यानुसार सदर पथकास मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्हयातील सितामउ तालुक्यातील रावठी गावात या गुन्हयातील संशयित राहुल पाटीदार (पुर्ण नाव माहित नाही) याने त्याच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या गोडाउनमध्ये चोरीस गेलेले वाहन लपवून ठेवले असल्याने सीतामउ पोलीस स्टेशन कडील पोलीस मदत घेवुन संशयितच्या घराची व गोडाउनची झडती घेतली असता त्या ठिकाणी नागपूर येथील भाजपचा कार्यकर्ता पियुष मुसाळे यांची चोरी केलेले एक टोयोटा कंपनीची पांढऱ्या रंगाची फॉरच्युनर व जळगाव तालुक्यातील निमखेडी येथील निलेश पाटील यांची एक हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रेटा कार मिळून आली. ही चारचाकी वाहने जप्त करून अमळनेर पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याच्या तपासात वर नमुद चारचाकी वाहन राणाप्रताप नगर पोलीस स्टेशन, नागपूर (शहर) येथील दाखल गुन्हयातील तसेच जळगाव (तालुका) पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झालेले आहे.