अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे बु.येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत दोन वाजून दोन मिनिटांनी जपान मधील मियावाकी पद्धतीने विविध प्रकारच्या 202 झाडांची 202 विद्यार्थ्यांनी लागवड केली.
पर्यावरण संरक्षण व रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, ही गरज ओळखून आश्रम शाळेत पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक उदय पाटील व शिक्षक अविनाश अहिरे यांच्या संकल्पनेतून आज दोन वाजून दोन मिनिटांनी जपान मधील मियावाकी पद्धतीने विविध प्रकारच्या 202 झाडांची लागवड 202 विद्यार्थ्यांनी केली. ती झाडे दत्तक घेतली. जपानमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच झाडांमध्ये देखील स्पर्धा लागते व झाडे जोमाने वाढू लागतात. यावेळी पर्यावरण संरक्षणाची शपथही घेण्यात आली, असा अनोखा उपक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत राबवण्यात आला. उपक्रमाचे यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहायक प्रकल्पाधिकारी पवन कुमार पाटील, चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्षा विद्याताई पाटील, सचिव युवराज पाटील, ॲड. अभिजीत पाटील, सर्व संचालक मंडळ यांनी कौतुक केले.