स्टेट बँकेच्या नावाने आधार केवायसी करण्याची लिंक पाठवून मोबाईल केले हॅक
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील अनेक जणांचे मोबाईल हॅक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. स्टेट बँकेच्या नावाने आधार केवायसी करण्याची लिंक पाठवून हे मोबाईल हॅक केले आहेत. व्हाट्सएप ग्रुपचा लोगो आणि आयकॉन देखील एसबीआयच्या नावाने बदलवले गेले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, कोणी तरी एकाने तुमचे एसबीआय खाते तात्पुरते थांबवण्यात आले आहे. आणि खाते आज रात्री कायमचे बंद होऊ शकते. आधार अपडेट नाही. आधार केवायसी करून घ्या, असा संदेश आणि सोबत एसबीआय आधार अपडेट एपीके फाईल पाठवली. ज्याने ही फाईल ओपन केली त्याचा नंबर हॅक करून त्याच्याच नंबरने तो ज्या ग्रुपमध्ये आहे त्याचे सर्व व्हाट्सएप ग्रुपला एसबीआय आयकॉन लावून पुन्हा त्याच्या नंबरने तसेच संदेश पाठवण्यात आले. त्या ग्रुपमधून कोणीतरी लिंक ओपन करताच त्याचेही मोबाईल हॅक झाले. जळगाव जिल्ह्यातील बहुतेक शिक्षकांचे पगार खाते एसबीआय बँकेत असल्याने अनेक जण या बनावट संदेशाच्या माध्यमातून फसले. अमळनेरमध्ये गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचा एमडीएम हा ग्रुप त्यानंतर शिक्षकांचा जुनी पेंशन ग्रुप मधील नंबर हॅक करून आयकॉन बदलवण्यात आले होते. सदरची माहिती कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सावधानतेचे संदेश टाकायला सांगितल्याने अनेक जण सावध झाले व जिल्हयात अनेकांनी लिंक ओपन केल्याने नंबर हॅक झाल्याचे सांगितले.
तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार करावी
नंबर हॅक होताच त्यांच्या व्हाट्सएपचा ताबा घेऊन सर्व माहिती हॅकरकडे जाते. त्यामुळे बँकेची महत्वाची माहिती, पासवर्ड, एटीएम, आधार, पॅन कार्डची माहिती देखील जाऊ शकते. म्हणून नागरिकांनी तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार करावी
–दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक अमळनेर
त्वरित बँक आणि सिम कंपनीशी संपर्क साधावा
प्रत्येकाने व्हाट्सएप नंबरला टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यावे म्हणजे नंबर किंवा व्हाट्सएप हॅक होणार नाही. झाला असल्यास त्वरित बँक आणि सिम कंपनीशी संपर्क साधावा.
– संजय पाटील ,तालुकाध्यक्ष माध्यमिक शिक्षक संघ अमळनेर