अमळनेर तालुका वकील संघाने मागणी करून जिल्हा स्तर न्यायाधीश व तहसीलदार यांना दिले निवेदन
अमळनेर न्यायालयात वकील संघाने न्यायलयीन काम बंद करुन केला निषेध
अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथील अॅड. रामेश्वर बोराडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून वकील संरक्षण कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणी अमळनेर तालुका वकील संघाने केली आहे. यासंदर्भात जिल्हास्तर न्यायाधीश व तहसीलदार यांना निवेदन दिले.
न्यायाधीश व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, नाशिक येथील ख्यातनाम वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर नुकताच झालेला भ्याड व अमानुष प्राणघातक हल्ला हा संपूर्ण वकिल बिरादरीच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक, निंदनीय व चिंतेचा विषय आहे. न्यायव्यवस्थेचा एक अत्यावश्यक व अभिन्न घटक असलेल्या वकिलांवर असे पद्धतशीर हल्ले होणे, ही केवळ त्या व्यक्तीविषयीचा नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेविषयी असलेल्या द्वेषाची लक्षणं आहेत. आजच्या घडीला अनेक वकील समाजासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. परंतु वकिलांवर वारंवार होणारे हल्ले पाहता, त्यांना सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर “वकील संरक्षण कायदा” हा महाराष्ट्रात तातडीने लागू होणे अत्यावश्यक आहे.
आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पुढील मागण्या करीत आहोत: यासाठी अॅड. रामेश्वर बोराडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करण्यात यावा व आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यातील सर्व वकील बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कायदा तातडीने संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात यावा. जिल्हा व तालुका स्तरावर वकील सुरक्षेसाठी विशेष समित्या स्थापन करण्यात याव्यात. वकिलांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध जलदगतीने खटले चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी. अशा मागण्या अमळनेर तालुका वकील संघाने निवेदनाद्वारे केल्या आहेत. निवेदनावर ॲड. किरण पाटील (अध्यक्ष), ॲड. आर.आर. पाटील, ॲड आर . वी. निकम, ॲड. माधव बडगुजर, ॲड. सुरेश सोनवणे. ॲड. दिनेश पाटील, ॲड. किशोर डी. पाटील, ॲड. अमजद खान, ॲड. सुशील जैन. ॲड. आर. ए. निकुंभ. ॲड. डी. पी. परमार. ॲड. उमेश पाटील, ॲड. डी. वाय. पाटील, ॲड वाय. पी. पाटील, ॲड. जगदीश बडगुजर आदींच्या सह्या आहेत.