अमळनेर (प्रतिनिधी) सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेषभूषा करीत आषाढी एकादशी साजरी केली. या वेळी त्यांनी मेळा भरवत विठ्ठल नामाचा गजर करीत परिसरात काढलेली दिंडी सोहळा लक्षवेधी ठरला.
विठ्ठल व रुक्मिणीच्या पेहरावातील विद्यार्थी साक्षात विठू रुखमाईची प्रचिती देत परिसरात ‘विठ्ठल विठ्ठल ‘ नामाचा गजर करीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन नववारी साडी घातलेल्या विद्यार्थिनी रांगेने चालत होत्या. पांढरे कपडे घातलेले वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी टाळ वाजवीत माऊली माऊली करीत वातावरण विठूमय करीत होते. सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या आवारातून विद्यार्थ्यांनी दिंडीला सुरुवात केली. मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी दिंडीचा शुभारंभ केला. दिंडी शंकर नगर परिसर, पिंपळे रोड परिसरातून सरस्वती विद्या मंदिर येथे समारोपप्रसंगी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विठ्ठल गीतांवर टाळ वाजवीत यथेच्छ नृत्य केले. या वेळी शिक्षिका संगिता पाटील, गीतांजली पाटील, पूनम पाटील उपशिक्षक ऋषिकेश महाळपूरकर, धर्मा धनगर आदींनी दिंडीत सहभाग घेतला. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष समाधान शेलार उपस्थित होते.
लोकमान्य नवीन मराठी शाळा दिंडीने भक्तिमय
लोकमान्य शिक्षण मंडळाच्या नवीन मराठी शाळेने दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीत विठ्ठल रुख्मिणीच्या वेषातले विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते. पुढे लेझीम पथक, मागे टाळ चिपळ्या असलेले बाल वारकरी होते, त्यामागे भगवंतांची सजवलेली पालखी होती. त्यामागे शाळेचे शेकडो विद्यार्थी पारंपरिक वेषात सहभागी झाले होते. स्पीकर वर लावले जात असलेले विठुरायाचे गाणे व अभंग यामुळे वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते. ही दिंडी पवन चौक, गोपाल चौक, सराफ बाजार मार्गे वाडी चौकात पोहचून तेथे रिंगण सोहळा पार पडला. नंतर वाडी संस्थानच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डी. डी. पाटील व चिटणीस विवेकानंद भांडारकर तसेच पालकही दिंडीत उपस्थित होते. मुख्याध्यापक अतुल भोई व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल
पी.बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्ताने सकाळी मंगल प्रहरी सर्व विद्यार्थी व शिक्षक समवेत हरिनामाचा जयघोष करीत वारकरी दिंडी काढण्यात आली.विद्यार्थी शिक्षक हे आज वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान करून आले होते. अतिशय उत्तम आकर्षक व मनमोहक म्हणजे साक्षात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत मुक्ताबाई तर कोणी विठू रुक्माई अशा नानाविध वेशभूषेतील ही मंडळी समस्त अमळनेर नगरीतील जनतेचे लक्ष वेधून घेत होते. हरिनामाचा जयघोष टाळ मृदुंग चिपळी वाजवीत भक्ती गीत कीर्तन भजन गाऊन या दिंडीला एक भक्तिमय उत्तुंग उंची प्राप्त करून दिली होती. शिक्षिका व विद्यार्थ्यांनी चौका चौकात फुगडी खेळून या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमासाठी चेअरमन प्रदीप के. अग्रवाल, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका एम. एस. बारी यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी व्ही. पी. बडवे, व्ही. जी. बोरोले, प्रशांत वंजारी, योगिषा महाजन, सुवर्णा भावसार, अनंत बागल, तृप्ती शर्मा, पूजा बोरसे, ज्योती जोशी, अनिता मराठे, पूनम पाटील, स्वाती शिंगाणे उपस्थित होते.