अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नगरपालिका बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पाचपावली देवी चौक ते वड चौकादरम्यान असलेल्या रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे व काँक्रीट मधील लोखंडी सळ्या वर आलेल्या आहेत. भला मोठा खड्डा पडल्यानंतर देखील सर्वांनी दुर्लक्ष केले. मात्र एका चिमुकल्याने या ठिकाणी अपघात टाळावे. म्हणून काँक्रीट रस्त्यांमधून वर आलेल्या सळीला प्लास्टिक फोमचे कार्टून बनवून त्यावर ‘सावधान’ असे कलरने नाव टाकून त्या कार्टूनला फुलहार घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी काँक्रीट रस्त्यांमधून लोखंडी सळ्या वर आलेल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची निवासस्थाने देखील या रस्त्यालगतच आहेत. हा रस्ता शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण आहे. पण या खड्ड्यांमुळे पायी चालणे अवघड होते. त्यातच पावसामुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी हे कार्टून वाहनधारकांना निदर्शनास येत आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने त्वरित काँक्रीट मधील वर आलेल्या सळ्या कटरने कापून खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतुकीची सुरक्षा निर्माण करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे.
त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी
राज्य महामार्ग १५ धुळे रोडपासून येणारा हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असून देखील नगरपरिषद प्रशासनाचे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. त्याचप्रमाणे शाळेकरी मुलांचा देखील या रस्त्यावरून वापर मोठ्या प्रमाणावर आहे. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने रोज वाहनांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे नगरपरिषद बांधकाम विभागाने त्वरित या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करावी.
–निलेश लांडगे, रहिवासी, अमळनेर
लगेच खड्डा बुजवण्याचे काम करू
पाचपावली देवी चौक ते वड चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू असून प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येईल. त्याचबरोबर त्वरित काँक्रीट रस्त्यामधील वर आलेल्या सळ्या कापून लगेचच खड्डे बुजवण्याचे काम करून रस्ता वाहतुकीसाठी नागरिकांना खुला करण्यात येईल.
–डिगंबर वाघ, प्रभारी उपअभियंता, नगर परिषद,अमळनेर