अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाळा, महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी, पालखी आणि रिंगन सोहळा साजरा करून श्री.विठ्ठल रुक्मीनी यांचा गजर केला. टा, मृदूंगाच्या गजरात विविध संतांची वेशभूषा करून शाळेत भक्तीमय वातावरणात अवघी पंढरीच अवतरली होती.
ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांची दिंडी
अमळनेर येथील ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली.मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. मंगेश वैद्य व सचिव डॉ.वैशाली वैद्य तसेच संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने ही दिंडी काढण्यात आली. प्रथम श्री.विठ्ठल रुक्मीनी मातेचे प्रतिमा पुजन करण्यात आले. विद्यार्थी / विद्यार्थीनींनी सुंदर वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांच्या मदतीने बनविलेली पालखी व टाळ मृदूंगाच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात दिंडी काढण्यात आली. दिंडीत मुख्याध्यापक विनोद धनराज पाटील, कल्पना ठाकूर, वैशाली राऊळ, सोनाली पवार, हेरंब कुळकर्णी, शांतिलाल पाटील, नामदेव जाधव आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
जिप प्राथ. शाळा जवखेडे
अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील जिप प्राथमिक शाळेत दिंडी सोहळा झाला. यावेळी देवा विठ्ठलाची पालखी सोबतच शिक्षणाचे महत्व सांगणारी ग्रंथदिंडी व पर्यावरणाचे महत्व सांगणारी वृक्षदिंडी देखील काढण्यात आली. या वारीचे मुख्याध्यापक छगन पाटील यांनी पालखीतील विठुरायाच्या मूर्तीचे तसेच ग्रंथाचे व वृक्षाचे पूजन करून उद्घाटन केले. या वारीत शाळेचे विद्यार्थी बाल वारकरीच्या वेशात हाती टाळ घेतलेले तर विद्यार्थीनी महाराष्ट्राची पारंपारीक वेशभूषा म्हणजे नऊवारी साडी डोईवर तुळस असे जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा नामघोष करत विठ्ठल भेटीला बुद्धी व गुणवतेचे मागणे मागायला निघाले होते. या बाल वारकऱ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. कुठेही गडबड गोंधळ न करता टाळांच्या साथीने पाऊले एका लयीत टाकत, रिंगण घालीत पालखी गावातून जाऊ लागली. सर्व गावकरी, सुवासिनी , म्हातारी माणसे या विठुरायाच्या पालखीचे पुजन करायला मोठया उत्साहाने पुढे येऊ लागली. या वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे इयत्ता २ रीचा विद्यार्थी प्रतिक सोनवणे संत सावता माळीच्या रूपातच अवतरला होता. जणू संताचे हे बालरूपही पाहण्यासारखेच होते. वारीच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक छगन पाटील, उपशिक्षक रत्नप्रभा साळुंखे, रेखा पाटील, सुनिता पाटील, अर्चना बागुल, श्मुकेश पाटील, माधवराव ठाकरे, युवा प्रशिक्षणार्थी अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले.
ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल
अमळनेर येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे देवशयनी आषाढी एकादशी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपारिक पोषाख धारण करून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले. इयत्ता ६ वीच्या विदयार्थ्यांनी लोक प्रबोधनपर भारुड सादर करत पाणी वाचवा चा संदेश देत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवाहन केले. सोबतच वारकरी संप्रदायाचे महत्व पटवून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पुजा करून त्यानंतर टाळ व मृदुंगाच्या गजरात विठू-रूख्माईच्या दिंडी-पालखीचा सोहळा सुरू होत दिंडी काढण्यात आली ज्यात रिंगण सोहळा देखील घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चैताली महाजन, राहूल चौधरी, गणेश सातपुते, सागर चावरिया, रमेश धनगर व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले.
स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल
अमळनेर येथील आषाढी एकादशीच्या पावन प्रसंगी, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे विठ्ठलभक्तीचा अद्भुत उत्सव अनुभवास आला. संपूर्ण शाळा जणू एक छोटंसं पंढरपूरच बनली होती.
कार्यक्रमाची सुरुवातीला विद्यार्थ्यांनी विविध संतांचे रूपरेखा साकारलेली होती. बाल विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचे रूप घेऊन एक सुंदर असे नृत्य सादर केले. शाळेतील मोठ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी संत नामदेवांचे जीवनावर आधारित एक सुंदर अशी नाटिका सादर केली. प्रमुख मुख्य आकर्षण ठरले ते वाडी चौकातील वेधशाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले रिंगण तसेच टाळ मृदुंगात विठ्ठलाचा केलेला जयघोष. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाखडण्याजोगा होता. शाळेत जणू वारकरीच अवतरले होते. संपूर्ण कार्यक्रम हा शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी पार पडला.