अमळनेर (प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सकाळी साडे सात वाजता श्री मंगळग्रह मंदिरातून दिंडी काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी वरुणराजाने ही हजेरी लावली.
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे काढलेल्या दिंडीत सजविलेल्या पालखीत श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेची मूर्ती होती. मंदिरात उपस्थित भाविकांनी सपत्नीक पालखीतील मूर्तींचे मंत्रोपचारात पूजन केले. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली.
दिंडी मार्गात श्री मंगळग्रह मंदिराचे सेवेकरी तसेच पुरोहितांनी टाळ व विविध वाद्यांच्या गजरात श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेची भावगीते, भक्तिगिते, अभंग म्हटले. मंदिरापासून निघोलेली दिंडी चोपडा नाका, फरशी पूल, दगडी दरवाजा, सराफ बाजार या मार्गाने संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहचली. दिंडी मार्गातील अनेक भाविकांनी नृत्य व फुगडीचा मनमुराद आनंद घेतला. ठिकठिकाणी माताभगिनींनी पालखीतील मूर्तींचे पूजन केले. अनेकजण दिंडीत वारकऱ्याच्या वेशात सहभागी झाले होते. वाडी संस्थानातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मातेच्या मंदिरात पालखीतील मूर्ती काही वेळ ठेवून मंत्रोपचार व आरती झाली. त्यानंतर पालखीतील मूर्ती संतश्री सखाराम महाराज समाधीस्थळी नेऊन तेथेही पूर्जा-अर्चा करण्यात येऊन दिंडीची सांगता झाली. याप्रसंगी मंदिराच्या विश्वस्थ जयश्री साबे,मंगळ ग्रह सेवा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. आर. जी. चव्हाण, सेवेकरी आर. टी. पाटील यांच्यासह मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.