अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी बालवाडी विभाग येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या पालकांच्याच हातून फित कापून विद्यार्थ्यांचे औक्षण केले. तसेच फुलांचा वर्षाव आणि रंगीबेरंगी रंगांनी त्यांच्याच छोट्या-छोट्या हातांचे ठसे अत्यंत कल्पकतेने तसेच एकमेकांच्या आकर्षणाने कोऱ्या कागदावर उमटवण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ स्वरूपात पेढा देण्यात आला.
संस्थेचे सचिव संदीप घोरपडे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, सहसचिव अॅड. बाविस्कर, संचालक मगन पाटील, भास्कर बोरसे, किरण पाटील, साने गुरुजी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, साने गुरुजी विद्या मंदिराचे मुख्याध्यापक संजीव पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका महाजन यांनी सर्वांनी पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले. मगन पाटील यांनी पालकांना सुसंस्कारी विद्यार्थी हा कसा घडतो याविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव घोरपडे यांनी त्यांच्याच विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हा शिक्षकांसोबत पालकांचाही सिंहाचा वाटा असतो याचे स्पष्टीकरण केले. सूत्रसंचालन लतिका शिंगाने यांनी केले.