मुन्ना शर्मा यांचा प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे लेखी मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) येथील न्यू प्लॉट भागातील नागरिकांसाठीचे मतदान केंद्र क्रमांक १४६ हे ग्लोबल स्कूल येथे आहे. त्यामुळे निवडणुकीत या केंद्रावर जाण्यासाठी वृद्ध व अपंगांना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याने या केंद्राचे स्थलांतर जवळ करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भगवानदास शर्मा (उर्फ मुन्ना शर्मा) यांनी केले आहे.
शर्मा यांनी पालिका निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. सध्या मतदान केंद्र क्रमांक १४६ हे ग्लोबल स्कूल येथे आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी मतदारांना सुमारे दीड किलोमीटर अंतर चालत जावे लागते. त्यामुळे वयोवृद्ध, अपंग तसेच महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, या विभागातील मतदानाची टक्केवारी कमी राहते, असे शर्मा यांनी निवेदनात नमूद केले आहे. शर्मा यांनी पुढे नमूद केले की, न्यु प्लॉट येथील भगिनी मंडळ शाळा ही जागा मतदानासाठी अधिक सुलभ व जवळची असून, तेथे मतदान केंद्र स्थलांतरित केल्यास नागरिकांचा सहभाग वाढेल आणि लोकशाही प्रक्रियेला बळ मिळेल. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित प्रशासन योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.