बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा तरुणांच्या आवळल्या मुसक्या

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या न्याहळोद आणि  पातोंडा येथील दोघा तरुणांच्या  बसस्थानकावर मुसक्या आवळल्या. पिस्तूल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. १४ जून रोजी रात्री पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली की बसस्थानक परिसरात दोन तरुण पिस्तूल घेऊन फिरत आहेत. त्यांनी लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस जितेंद्र निकुंभे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, उज्वलकुमार म्हस्के याना बसस्थानकावर आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले. पोलिसांना पाहताच पाठीवर बॅग लटकवलले दोन तरुण पळू लागले. पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या.  खेमराज विजय पाटील (वय २३ रा न्याहळोद धुळे), रोहित रामकृष्ण अहिरे (वय २३ रा. पातोंडा ता. अमळनेर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या बॅगची झडती घेतली असता त्यात काळ्या कपड्यात २५ हजार रुपये किमतीचे बनावट पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी दोघांविरुद्ध शस्र कायदा कलम ३ ,५ , ३७(१)(३) चे उल्लंघन कलम १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *