मारवड येथे महाराजस्व शिबिरातून नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत विविध दाखले कागदपत्रे वाटप करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

मारवड येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक मुलांच्या शाळेत शिबीराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ उपस्थित होत्या.  अभियानांतर्गत  मारवड मंडळ भागातील मारवड, शहापूर, कळमसरे, प्र डांगरी, निम व करणखेडा या गावातील नागरिकांसाठी  शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात आमदार आणि खासदार यांनी  नागरिकांशी संवाद साधला. शिबीरात प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका कषी अधिकारी आधार संस्था, तसेच तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे अथवा समस्यांचे निराकरणकरून वंचित लाभार्थीना आमदार अनिल भाईदास पाटील यांचे हस्ते प्रमाणपत्र धनादेशाचे वाटप करण्यात आले. एल. जी. चौधरी यांनी सुत्रसंचालन केले.

 

असा देण्यात आला लाभ

 

पुरवठा शाखा – ६७ शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, संजय गांधी योजना – ३ राष्ट्रीय अर्थसहाय्य धनादेश वितरित, २६५ डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, १२ नवीन लाभार्थी भरून घेण्यात आले. निवडणूक शाखा – १३ मतदारांकडून नमुना ६ अर्ज भरून घेण्यात आले. स्थलांतरीत मतदारांकडून नमुना ८ भरून घेतला. सेतू शाखा कार्यालय – १७५ उत्पनाचे दाखले, २४ रहिवासी दाखले, ७५ जातीचे दाखले, २२ आधार नोंदणी, ७२  आधार दुरुस्ती, पंचायत समिती – महात्मा गांधी रोजगार योजनेतून  २५ सिंचन विहिरी प्रशासकीय  मान्यता,१० गोठशेड प्रशासकीय  मान्यता, ३४ जलतारा प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *