अमळनेर पालिकेसाठी महायुती व शहर विकास आघाडीच्या हालचाली गतिमान

अमळनेर (प्रतिनिधी) वॉर्ड, प्रभाग रचनेचे आदेश प्राप्त झाल्याने स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच आमदार अनिल पाटील यांच्या गटाकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. तर इच्छुक ही गुडघ्याला बासिंग बांधून तयार आहेत.

 नगरपालिका निवडणुकीसाठी आमदारांनी महायुती अथवा शहर विकास आघाडी असे दोन्ही पर्याय समोर ठेवले असले तरी यासंदर्भात राष्ट्रवादी काँगेस पक्ष श्रेष्ठी व महायुतीचे आदेश काय येतात यानुसारही ते निर्णय घेणार आहेत. तसेच संभाव्य इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मते देखील ते जाणून घेणार आहेत. तसेच मित्र पक्ष असलेल्या भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांशी देखील ते चर्चा करणार आहेत. मात्र प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी त्यांनी आतापासूनच सुरू केली असून कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार सरस ठरू शकतो, याबाबत तेथील नागरिकांची मते ते जाणून घेत आहेत.

1 सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना करण्याचे आदेश

 

शासन आदेशानुसार पालिकेकडून प्रभाग रचना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून साधारणपणे 1 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना करण्याचे आदेश आहेत. त्यानंतर लागलीच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास ऑक्टोबरअखेर मतदान प्रक्रिया पार पडण्याचे संकेत आहेत. अमळनेर शहरात नगरपरिषद असल्याने येथे अ आणि ब असे दोन सदस्य संख्येचे प्रभाग असणार आहेत. नगराध्यक्ष निवड लोकनियुक्तच असेल असे मानले जात असून यासंदर्भात अधिकृत आदेश आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष आरक्षण कोणते निघते यावर देखील निवडणूकीचे महत्व अधिरेखीत होणार आहे. यामुळे या साऱ्या आदेशाची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

 

निवडणुकीत राहणार तगडे आव्हान

 

दरम्यान अमळनेर पालिकेत आतापर्यंत सलग दोन निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांनी निर्माण केलेल्या शहर विकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली असून याहीवेळी ते शहर विकास आघाडी किंवा महायुती दोन्ही पर्याय पुढे करू शकतील, असे बोलले जात आहे. एकंदरीत आज स्थितीला सक्षम व दमदार इच्छुक उमेदवारांची टीम त्यांच्या सोबत असल्यांने निश्चितच तगडे आव्हान त्यांचे याही निवडणुकीत राहणार असे स्पष्ट दिसत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *