शिरुड अभ्यासिकेला आमदार अनिल पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन केले कौतुक

अमळनेर (प्रतिनिधी) शिरुड येथे लोकवर्गणीतून विद्यार्थ्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती वायफायुक्त अभ्यासिकेला आमदार अनिल दादा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आमदार अनिल पाटील यांच्या यांच्या समवेत अमळनेर तालुका मराठा समाजाचे उपाध्यक्ष संजय कृष्णा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे संचालक डॉ. अशोक पाटील व महेंद्र पाटील (पातोंडा) उपस्थित होते. यावेळी आमदारांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केली. त्यांना असलेल्या अडचणी समजावून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतीही संधी सहजासहजी मिळत नाही, संधी शोधता आली पाहिजे. योग्य संधी शोधून त्या संधीचं सोने करता आले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असल्याची खात्री होईल. सरकारी आस्थापनातील जागा कशा निर्माण होतात व त्यांची जाहिरात कशी शोधावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच तुम्हाला असलेल्या समस्या सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन. आवश्यक असणारी पुस्तके देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या अभ्यासिकेतून एखादा अधिकारी घडला तर निश्चितपणे मी त्याच्या सत्काराला येईल, असे जाहीर केले. आमदार अनिल पाटील व मान्यवरांनी अभ्यासिकेला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह द्विगुणीत झाला. आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, याची जाणीव त्यांना झाली. यावेळी समन्वयक डी. ए. धनगर व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदारांनी देखील विद्यार्थ्यांची अभ्यास, चिकाटी व सातत्य पाहून समाधान व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी योगदान देऊन सर्व सुविधायुक्त अभ्यासिका निर्माण करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे सुद्धा आमदार पाटील व मान्यवरांनी कौतुक केले. शिरूडकरांचे दातृत्व मला नेहमी आवडते असे सांगितले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन क्लास उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक प्रशांत कदम व प्राचार्य ऋषिकेश पाटील यांचे देखील आभार मानण्यात आले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *