अमळनेर (प्रतिनिधी) मोटरचा फ्यूज काढल्यावरून काका पुतण्यात झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने पुतण्याला सहा जणांनी मारहाण केल्याने हात मोडल्याची घटना ७ रोजी तालुक्यातील वावडे येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (वय ३०) हा ७ जून रोजी शेतात कपाशीला पाणी भरत असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्र याने याबाबत विचारले असता त्याचा राग आल्याने दोघात बाचाबाची झाली. त्यामुळे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या फिर्यादीच्या काकू सुलाबाई शिवाजी पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील त्याची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील, पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन नरेंद्र याची सुटका केली. या मारहाणीत त्याला जबर दुखापत होऊन त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने वरील नमूद सहा जणांविरुद्ध मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.