तासखेडा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात दंगल, २२ जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील तासखेडा येथे वाढदिवसाला दुसऱ्या लोकांना का बोलावले आणि माझ्याकडे का बघतो या कारणावरून  दोन गटात दंगल उसळली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, समीर नाना ठाकूर याने फिर्याद दिली की , २७ एप्रिल रोजी पुतण्याचा वाढदिवस होता म्हणून त्याने त्याच्या शेतातील कामावरील माणसांना वाढदिवसाला बोलावले होते. त्यांना वाढदिवसाला का बोलावले म्हणून मंगल डोंगर भिल व जगदिश मंगल भिल घरासमोर आले आणि या लोकांना का बोलावले म्हणून शिवीगाळ  करू लागले. समीरचा भाऊ चेतन ठाकूर समजावायला गेला असता त्याला मारहाण केली होती. याबाबत चेतन ठाकूर याने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. पोलिस स्टेशनला देखील मंगल भिल याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. २९ रोजी पुन्हा सायंकाळी साडे सहा वाजता मंगल डोंगर भिल, सुनंदा मंगल भिल, भुरेश डोंगर भिल, जगदीश मंगल भिल, सतीश मंगल भिल, किरण महारु भिल, आशाबाई महारु भिल, ज्योती लोटन भिल, मोनि नाना भिल, वंदाबाई सोमा भिल, अजय प्रताप भिल, दीपक नाना भिल हे हातात लाठ्या काठ्या घेऊन घरासमोर आले. व पोलिसात तक्रार करतो का म्हणून मंगल भिल याने हातातील लाकडी दांडक्याने चेतन ठाकूर यांच्या डोक्यात मारून जखमी केले. इतरांनी हातातील काठ्या आणि दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. समीर त्यांना आवरायला गेला असता त्यांनी समीरला देखील काठ्यांनी हात पाय कमरेवर मारहाण केली. चेतन याला उपचारासाठी आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. समीरच्या तक्रारीवरून सर्व १२ जणांविरुद्ध  भारतीय न्यायसंहिता कलम १०९,१८९(२), १९१(२)१९१(३), ११५ ,३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल  केला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

दुसऱ्या गटातर्फे महिलेने फिर्याद दिली की ,तिचा मुलगा जगदीश २८ रोजी ॲक्वाचे पाणी घ्यायला गेला असता चेतन ठाकूर याने माझ्याकडे का बघतो म्हणून चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. जगदीश याने पोलिसात फिर्याद दिली होती. २९ रोजी संध्याकाळी साडे सात वाजता घराबाहेर शिवीगाळ करण्याचा आवाज आला. चेतन नाना ठाकूर, सागर नाना ठाकूर, निलेश रावसाहेब पाटील, रोहित रावसाहेब पाटील, विनोद चिंधा भिल, अनिल सीताराम शिंदे, सनी चिंधा भिल, आकाश सुनील भिल, महेश रूपंचंद भिल, एकनाथ आण्णा भिल हे महिलेला अश्लील शिवीगाळ करत होते. जगदीश व सतीश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करत होते. चेतनने जगदीशच्या डोक्यावर मारून दुखापत केली. सागर याने भुरेश याच्या पाठीवर व पायावर मारून दुखापत केली. जगदीश याच्या डोक्यातून रक्त निघू लागले. महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि चांदीचे बेले तुटून नुकसान झाले. तसेच महिलेला अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या फिर्यादीवरून सर्व दहा जणांविरुद्ध  भारतीय न्याय संहिता ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), २९६,३२४(४), ३५२ ,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *