शांततेच्या मार्गाने सुरू असलेले अहिंसक आंदोलन जनतेच्या हातात जाईल होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल असा निर्वाणीचा इशारा समितीने दिला..
अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेरसह ६ तालुक्यांसाठी संजीवनी ठरणारा प्रकल्प ‘पाडळसे धरणाचे काम भरघोस निधीसह युद्धपातळीवर व्हावे ! ‘या मागणीसाठी जन आंदोलन समितीने पाडळसे धरणावर मोर्चा नेत भर उन्हात धरणाच्या छातीभर पाण्यात उतरून दिवसभर “जलसत्याग्रह”आंदोलन केले. दिर्घकाळापासून सुरू असलेल्या धरण प्रश्नावरील जनआंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री व सरकारचा जोरदार धिक्कार करित निषेधाच्या घोषणा देण्यात आल्यात.
जलसत्याग्रहानंतरही शासनाने दखल न घेतल्यास आता जलसमाधी, आमरण उपोषण, रास्ता रोको प्रसंगी आत्मदहनासही आम्ही तयार आहोत. मात्र यामुळे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले अहिंसक आंदोलन जनतेच्या हातात जाईल होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहिल असा निर्वाणीचा इशारा याप्रसंगी समितीने दिला आहे.
‘जलसंपदा मंत्री’ हाय हाय! ‘पालकमंत्री’ हाय हाय! लोकप्रतिनिधिंचा निषेध असो.!
धरणाच्या पूर्ती साठी शासनाचे लक्ष पाडळसे धरणाकडे वेधण्यासाठी जनआंदोलन संघर्ष समितीने मोठे आंदोलन उभारले आहे.
१२ दिवसाच्या साखळी उपोषण आंदोलनानंतर तिव्रता वाढवत जेलभरो आंदोलन,तापी प्रकल्प कार्यालयावर ‘जाब विचारो’ आंदोलनाच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू ठेवले आहे. ७ मार्च ला पाडळसे धरणावरच शेकडो लोकांनी महिलां,शेतकरी, युवकांसह तापी नदीच्या पाण्यात उतरून जलसत्याग्रह आंदोलन दुपारी भर उन्हात तेही छातीभर पाण्यात व कंबरेएवढ्या खोल गाळात निर्भयपणे उभे राहून केले.जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री,राज्याचे महसूलमंत्री असलेले जळगाव चे पालक मंत्री यांनी आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने ‘जलसंपदा मंत्री हाय हाय! पालकमंत्री हाय हाय! लोकप्रतिनिधिंचा निषेध असो! च्या घोषणां देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
समितीचे सुभाष चौधरी हे सौ.उषा चौधरी यांचेसह सपत्निक तर प्रा.शिवाजीराव पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, डी.एम.पाटील, नामदेव पाटील, अजयसिंग पाटिल, योगेश पाटिल, रणजित शिंदे, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, महेश पाटील, देविदास देसले, सुनिल पवार, रामराव पवार, पुरुषोत्तम शेटे, महिला कार्यकर्त्या सौ.प्रतिभा पाटील, सौ.पायल पाटील, सौ.सुनिता पाटील, पिंपळेच्या सौ.सुरेखा पाटील, सौ.स्वाती पाटील, संजय पुनाजी पाटील,अंतुर्ली चे शिवाजीराव पाटील,मुख्तार खाटीक, पाडळसे चे भागवत पाटील,भूषण पाटील ,विकास पाटील, रविंद्र पाटील, मंगल पाटील, शांताराम पाटील, गोपाळ कोळी,शहापूरचे भानुदास पाटील, बन्सीलाल पाटील,सुरेश पाटील, कल्याण पाटील,खेडी पोलीस पाटील सोनू पाटील, अभिमन पाटील,वासरे दादाभाऊ पाटील, बिभीषण पाटील व ग्रामस्थ ,अमळनेर चे दिलीप हातांगळे,कुंदन चौधरी,राजेंद्र देसले, मेहमूद बागवान,सुशिल भोईटे,निंबाजी चौधरी, सुहास एलमामे, सुपडू बैसाने,पराग पवार, धनगर दला पाटील उपस्थित होते.
तसेच पिंपळे, निंभोरा येथिल महिलांसह आंदोलकानीं पाण्यात उतरून “पाडळसे धरण झालेच पाहिजे!” ,धरण आमच्या हक्काचं ! अश्या घोषणांनी धरण परिसर दणाणून सोडला होता. पाडळसे, कळमसरे, डांगरी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी यावेळी मोठ्यासंख्येने काठावर उपस्थित राहून आंदोलकांच्या घोषणांना प्रतिसाद देत जोरदार पाठींबा दिला. नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील,रा.कॉ.तालुकाध्यक्ष सचिन पाटिल, बाळू पाटील,कळमसरेचे जितेंद्र राजपूत, भिकेसिंग राजपूत,बापू राजपूत यांनीही उपस्थिती दिली.
जनआंदोलन समितीने जल सत्याग्रह आंदोलन मागे घ्यावे म्हणून निम्न तापी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता सौ.रजनी देशमुख , प्रांताधिकारी सौ.सिमा अहिरे यांनीही समितीने जलसत्याग्रह आंदोलन मागे घ्यावे! असे आवाहन केले होते.
तर आ.शिरीष चौधरी यांनीही साखळी उपोषण दरम्यान मुख्यमंत्रीची व जलसंपदा मंत्रीची भेट घालून देण्याचे सांगितले होते.तहसीलदार सौ.ज्योती देवरे यांनीही जेलभरो आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केलेले होते.तर सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटिल यांनीही आंदोलकांची भेट घेतली होती. मात्र ठोस कार्यवाही व लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन थांबवायचे नाही ,आंदोलन पुढेच न्यायचे ! असा निर्धार समितीने जाहिर केला असल्याने समितीने एक एक टप्प्यानुसार निर्धारपूर्वक आजचे जलसत्याग्रह आंदोलनही जोरदारपणे यशस्वी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येत पोलिसांकडून महिला कॉन्स्टेबलसह कडेकोट बंदोबस्त धरण परिसरात ठेवण्यात आलेला होता.