अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विजेचा लपांडाव आणि नगरपालिकेकडून अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने निवेदन दिले आहे.
महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नेमाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरातील कोणतेही भागातील उच्च दाब व लघु दाब वाहिनीवरील वीज दुरुस्ती करण्यासाठी कुठलेही पूर्व सूचना न देता विद्युत पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. वीज गेल्यावर अनेकदा नळांना पाणी आल्यास पाणी भरणे शक्य होत नाही. तसेच दुपारी व संध्याकाळी उन्हाचे दिवस असल्याने घरात पंखे कुलर अचानक बंद होतात. त्यामुळे वीज ग्राहकांना तसेच वयोवृद्ध, गृहिणी आणि बालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. चौकशी करता कक्ष कार्यालयात फोन केल्यास ते कोणते प्रकारचा प्रतिसाद देत नाही किंवा फोन बंद येतो. आपण जातीने लक्ष घालून वीजपुरवठा विना सूचना न देता खंडित करू नये, अशी सूचना वजा तक्रार करण्यात आली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरात विविध ठिकाणी मुंदडा नगर व लक्ष्मीनगर आदी भागात जलवाहिनी फुटल्याने व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमान अतिशय वाढलेले आहे आणि पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाणी अत्यावश्यक सेवेमध्ये येते व पाणी पुरवठा बाबत विलंब हा एक नागरी अथवा ग्राहक सेवेची त्रुटी मध्ये गणली जाते. ती जबाबदारी आपण टाळू शकत नाही तरी आपण ग्राहकांची नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण तातडीने अंमलबजावणी करून ग्राहकांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. अमळनेर नगर परिषदेतर्फे उपमुख्य अधिकारी चव्हाण यांनी यांनी निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी अध्यक्ष स्मिता चंद्रात्रे, महिला प्रांत प्रमुख अॅड. भारती अग्रवाल , सचिव वनश्री अमृतकर, जिल्हा पालक मकसूद बोहरी, जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख विजय शुक्ल, जिल्हा ऊर्जा प्रमुख सुनील वाघ आणि जिल्हा उपसचिव सतीश देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती पीआरओ मेहराज बोहरी यांनी दिली.