अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जानवे येथे पैसे देवाण घेवाणच्या भांडणावरून सख्या भावाने भावाचे डोक्यात लोखंडी पावडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना २३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बहिरम मंदिराजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुखदेव बाबुलाल पाटील व रवींद्र कापडणीस हे बहिरम मंदिराजवळ सोडा गाडीजवळ उभे असताना अचानक दीपक बाबुलाल पाटील त्याठिकाणी लोखंडी पावडी घेऊन आले आणि सुखदेव पाटील यांच्या डोक्यात पावडी मारून दुखापत केली. यावेळी रवींद्र कापडणीस पावडी अडवायला गेले असता त्यांनाही हाताला दुखापत झाली. त्यांनतर दीपक बाबूलाल पाटील याने सुखदेव पाटील यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. आणि तुला जिवंत सोडणार नाही म्हणून धमकी दिली. सुखदेव पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचा मुलगा भूषण पाटील यांच्या फिर्यादिवरून दीपक पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहेत.