अमळनेर (प्रतिनिधी) जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे काढण्यात आलेले आरक्षण प्रक्रिया चुकल्याने नामाप्र आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतींचे महिला आरक्षण नव्याने २५ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता नगरपालिका सभागृहात ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
ज्या ग्रामपंचायतींचे आधीच आरक्षण निघाले होते, त्या ग्रामपंचायतींचे महिला आरक्षण काढताना परत समावेश झाल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९६४ मधील कलम (४)(५)(६) प्रमाणे कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २५ रोजी पुन्हा नव्याने नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण काढण्यात येईल. नामाप्र मध्ये एक आणि सर्वसाधारण प्रवर्गात पाच ग्रामपंचायतींच्या आरक्षणात फेरफार होऊ शकतो. तरी सर्व ग्रामस्थ आणि राजकीय पक्षाच्या सदस्यांनी आरक्षण सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.