अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्ताने लोणखुर्द ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अध्यक्षस्थानी सरपंच प्रा. डॉ. शशिकांत पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच मीनाताई भिल होत्या. सभेच्या सुरवातीला म. गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना अर्थात पोकरा योजनेच्या शासकीय अधिनियमानुसार कृषीताई म्हणून निवड करण्यात आलेल्या अर्चना विश्वास पाटील यांचा उपसरपंच मीनाताई भिल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामसेवक विजय पाटील यांनी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढी आणि पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा २ नावनोंदणीच्या संदर्भात सभेसमोर विषय ठेवल्यावर गटचर्चेच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात सरपंच प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांनी राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत स्थानिक राजकारणात सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे असलेले महत्त्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन हिमानी पाटील यांनी केले. आभार हर्षल पाटील यांनी मांनले. सभेस सर्व ग्रा. स., ग्रा. पं. शिपाई, संगणक परीचालक, आशाताई, कृषीताई, तांत्रिक सहाय्यक, रोजगार सेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.