अमळनेर (प्रतिनिधी) विलेपार्ले येथील जैन मंदिराची मुंबई महापालिकेने केलेली तोडफोड व पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या जैन समाजबांधवानी मूकमोर्चा काढून निषेध केला. यासंदर्भात प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांना निवेदन देण्यात आल.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जैन समाज हा शांतीप्रिय, अहिंसावादी असून देशाच्या प्रगतीत आर्थिकदृष्ट्या मोलाचे योगदान देणारा समाज आहे. अशा समाजावर वारंवार हल्ले होणे, ही चिंताजनक बाब आहे. आमच्या धार्मिक श्रद्धांवर व साधू-संतांवर होणारे आघात रोखणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे साधू-संतांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवावेत व त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. विहार यात्रेदरम्यान सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष सुरक्षा पथकाची नेमणूक करावी. विहार प्रवासात अपघात होणार नाही याची शासनाने विशेष खबरदारी घ्यावी. विलेपार्ले येथील मंदिर तोडफोड ही अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावणारी घटना असून, या स्थळी लवकरात लवकर मंदिर पुन्हा उभारण्यात यावे. जैन धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी विशेष कायदा करावा. तसेच, काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडला. सहभागी जैन बांधवांनी हातात निषेधाचे फलक धरून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तहसील आवारात सकल जैन समाजातर्फे पहलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. निवेदन देतांना राजकुमार छाजेड, महेंद्रलाल कोठारी, घेवरचंद कोठारी, प्रवीण जैन, विजय जैन, डॉ. संजय शहा, संजय गोलेच्छा, राजेंद्र जैन, प्रा. एस. डी. ओसवाल, प्रकाश छाजेड, महावीर पहाडे, जितेंद्र जैन अशोक छाजेड यांच्यासह सकल जैन समाज मोर्चात सहभागी होते.