निधी नसल्याने शिक्षण विभागाने महसूल मंत्रालयाच्या सूचनेला दाखवली केराची टोपली
अमळनेर (प्रतिनिधी) उन्हाची दहकता वाढूनही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये सरबत, ताक, ओआरएस पाकिटे मिळाली नाहीत. केवळ निधी नसल्याने शिक्षण विभागाने महसूल मंत्रालयाच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मार्च-एप्रिल महिन्यात उन्हाळा वाढल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वर्ग खोल्या थंड ठेवा, प्रथमोपचार आणि थंड पेयजलाची व्यवस्था करा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात सरबत, ताक, ओआरएस पॅकेट द्या, अशा सूचना महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आदेशाद्वारे 21 मार्च रोजी दिल्या आहेत. पण त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. आदेश देऊन तब्बल 33 दिवस होऊन देखील विद्यार्थ्यांना शीतपेय वाटपासाठी शाळांना स्वतंत्र निधी नसल्याने महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आदेशाद्वारे दिलेल्या सूचनेला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवली आहे. त्याचबरोबर वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शाळेच्या वेळा सकाळी कराव्यात, उन्हामुळे दुपारच्या सत्रात खेळाचे तास नको, असे शासन स्तरावरून शिक्षण विभागाला आदेश देण्यात आले असले तरी सरबत, ताक, ओआरएस पॅकेट साठीपैसे आणायचे कुठून असा यक्ष प्रश्न आहे. यंदा उन्हाचा तडाखा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात परीक्षा आटोपणे चांगले होते. मात्र शासनाने पहिली ते नववी पर्यंतच्या परीक्षा पुढे ढकलल्या. व या परीक्षा 25 एप्रिल पर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतर लगेचच पाच दिवसात शिक्षकांना पेपर तपासून 1 मे रोजी निकालही द्यायचा आहे. हे कसे साध्य होणार आहे. याचा साधा विचारही सरकारने केला नाही. आता शीतपेयाचा हा आदेश काढून अजून शाळांना खर्चात पाडले आहे. शासनाने दिलेले आदेश योग्य असले तरी या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने खर्च कुणी व कसा करायचा हा पोषण आहार पुरवठादार व मुख्याध्यापकांना प्रश्न आहे. त्याचबरोबर पोषण आहाराचे मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसताना विद्यार्थ्यांना पोषण आहार नियमित देण्यासाठी हा खर्च शिक्षक व मुख्याध्यापकांना स्थानिक पातळीवर करावा लागतो. एखाद्या शाळेत कमी विद्यार्थी संख्या असली तर ते शक्य होते.पण जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना एवढा खर्च करणे शक्य होत नाही. अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली. त्याचबरोबर पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. सरकारने दिलेले आदेश पालन करण्यासाठी शाळांना स्वतंत्र निधी न दिल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असलेली शीतपेयांची ही सूचना देखील यावर्षी कागदोपत्रीच राहत असल्याने पालक वर्गांमध्ये शिक्षण विभागा विषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सूचना राहिली कागदोपत्रीच
विद्यार्थ्यांना उन्हाळा असल्याने पोषण आहारामध्ये सरबत, ताक, ओआरएस पॅकेट देण्याबाबत आदेशाद्वारे सूचना केलेली असताना महिना होऊन देखील शाळेमध्ये प्रत्यक्षात सूचनेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ही सूचना यावर्षी कागदोपत्रीच राहील.
–शिवदास गोरख पारधी, पालक, अमळनेर