नेपाळ केसरी देवा थापा व हरियाणा केसरी शेरा पैलवानांची कुस्ती ठरणार आकर्षण
अमळनेर (प्रतिनिधी) येथील बंगाली फाईल मधील बालवीर व्यायामशाळेतर्फे २७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेला कुस्त्यांची महादंगल रंगणार आहे. सुप्रसिद्ध पैलवान नेपाळ केसरी देवा थापा व हरियाणा केसरी शेरा पैलवान यांच्यात प्रमुख कुस्ती होणार आहे. ऋतिक राजपूत धुळे आणि शमशाद पैलवान दिल्ली यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे. यासह चुरशीच्या १३ कुस्त्या होणार आहेत. यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.
या कुस्ती स्पर्धांचे भरत पवार यांनी आयोजन केले असून इंदिरा भवनच्या मागे ग्रामीण रुग्णालयासमोरील मैदानात या स्पर्धा होणार आहेत. प्रमुख कुस्तीसाठी १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर द्वितीय कुस्तीसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या कुस्त्यांसाठी पंच म्हणून युनूस पैलवान, आप्पा पाटील, विनोद पैलवान, शकील पैलवान काम पाहणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बालवीर व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी व्यायामशाळा, दि प्रतापकुमार व्यायामशाळा यांचे सहकार्य लाभत आहे. कुस्ती प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालवीर व्यायामशाळेतर्फे करण्यात आले आहे.