अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक विभागात खानदेश शिक्षण मंडळ अमळनेर येथे “पुस्तकांचे गाव” योजना सुरू करण्याबाबत शासन मान्यता देऊन आठ महिने उलटले तरी राज्य मराठी विकास संस्था मुंबई व खानदेश शिक्षण मंडळ यांच्यातील “पुस्तकांचे गाव” ही योजना राबवण्यास दिरंगाई होत आहे.
पुस्तकांचे गाव या योजनेमध्ये प्रत्येक पुस्तक दालनाला पाच लाख रुपये अनुदान देण्यात येत असते. त्यात दोन लाख रुपयांची पुस्तके व तीन लाख रुपयाची कपाटे, टेबल, खुर्च्या, रंगरंगोटी इत्यादीसाठी खर्च करण्यात येत असतो. मराठी भाषेचा विकास, प्रचार,प्रसार व संवर्धन व वाचन संस्कृतीची लोकांमध्ये जोपासना व्हावी. या दृष्टीने ही योजना राज्य शासनाने कार्यान्वित केलेली आहे. मात्र अमळनेर येथे “पुस्तकांचे गाव” योजनाचा विस्तार करण्यासाठी दहा दालनांच्या उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत खानदेश शिक्षण मंडळाला पत्रव्यवहार करण्यात आलेला असून अद्यापही खानदेश शिक्षण मंडळाने प्रताप महाविद्यालयातील पूज्य साने गुरुजी निवासस्थान (आनंद भुवन जवळ), संत सखाराम महाराज वाडी संस्थान, श्री मंगळ ग्रह मंदिर देवस्थान, लोकमान्य स्मारक समिती (जुनी ब्रिटिश लायब्ररी), मराठी वाड्मय मंडळ या दालनांची फक्त ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी विशद करून पाठवली आहे. मात्र इच्छुक जागा मालक व संस्थाचालक यांचे सहभागी अर्ज, तपशील पत्रक व प्रतिज्ञापत्र ही आवश्यक कागदपत्रे राज्य मराठी विकास संस्थेला आज पावतो न पाठवल्याने शासन निर्णयातील पुस्तक दालन तयार करण्यासाठी नमूद केलेल्या अटी व शर्ती तसेच आवश्यक निकषांची पूर्तता होत नसल्याने “पुस्तकांचे गाव” योजनेला आठ महिन्यापासून प्रत्येक पुस्तक दालनाला ५ लाख निधीची तरतूद करण्यास राज्य मराठी विकास संस्था यांना अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे खानदेश शिक्षण मंडळाने त्वरित पाचही पुस्तक दालनांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी मागणी शहरासह तालुक्यातील मराठी साहित्यिक, शैक्षणिक व वाचकवर्ग यांच्याकडून केली जात आहे.
खान्देश शिक्षण मंडळाशी केला पत्रव्यवहार
अमळनेर गावी दहा दालनांची उभारणी करणे अभिप्रेत आहे. प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन पाच जागांची पाहणी करून पुस्तक दालनासाठी सहभागी अर्ज, तपशील पत्रक, व प्रतिज्ञापत्र या आवश्यक कागदपत्रांचा नमुन्यात माहिती मागविण्यात आलेली आहे. त्यासाठी खान्देश शिक्षण मंडळाशी पत्रव्यवहार केलेला आहे. लवकरच ती माहिती प्राप्त झाल्यास पुस्तकांची दालने तयार करण्यात येतील.
–डॉ. श्यामकांत देवरे, संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्वरित करू
मी सचिव पदाचा नुकताच कार्यभार घेतल्याने “पुस्तकांचे गाव” योजनेची सविस्तर माहिती घेऊन संचालक राज्य मराठी विकास संस्था मुंबई त्याच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना पाचही पुस्तक दालनांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्वरित करण्यात येईल.
–प्रा. पराग पाटील, सचिव, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर