दोन दिवसाआड पाणी पुरवठा न केल्यास १ मे रोजी पालिकेवर काढणार मटका मोर्चा

नागरिकांनी मुख्याधिकारीना निवेदनाद्वारे दिला इशारा

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात पूर्वीप्रमाणे दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा १ मे रोजी पालिकेवर मटका मोर्चा काढून मटके फोडून निषेध करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी मुख्याधिकारीना निवेदनाद्वारे दिला आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर शहरातील नागरिक नियमित पाणी पट्टी कर व विविध कर भरत असून विलंब झाल्यास नगरपालिका दंड व व्याज आकारते. त्यामुळे नागरिकांनाही पिण्याचे पाणी नियमित मिळण्याचा मूलभूत हक्क आहे. सध्या नागरिकांना सहा दिवसांनंतर पाणी मिळते आणि त्यातही अनेकदा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. पाणी वितरण कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. त्यात नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना पाणी उपलब्ध असूनही कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आगामी काळात अमळनेरचा मोठा यात्रोत्सव आहे. प्रत्येक घरात पाहुण्यांची वर्दळ असेल. त्यामुळे पाणी जास्त लागेल.  त्यामुळे येत्या आठ दहा दिवसांत पूर्वीप्रमाणे दोन दिवसांच्या खंडानंतर पाणीपुरवठा करण्यात यावा. अन्यथा १ मे महाराष्ट्र व कामगार  दिनी पालिकेवर मटका मोर्चा काढून मटके फोडून निषेध केला जाईल. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास नगरपालिका जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला असून निवेदनावर भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, समाधान पाटील, एस. एच. चौधरी, गोपाळ महाजन, करतारसिंग मखिजा, विजय बोरसे, गणेश सोनवणे, मनोज मिस्त्री, रवींद्र ठाकूर, दिलीप ठाकूर, गणेश बडगुजर, दीपक पाटील, गोकुलसिंग परदेशी, देवा भोई, शिवा महाजन, देविदास भोई, सोमा ठाकूर यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आदिना देण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *