महाराष्ट्रातील एकूण ३०५ बाजार समित्यांपैकी राज्यात आली १७ वी
अमळनेर (प्रतिनिधी) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील ३०५ बाजार समित्यांपैकी तिसऱ्या क्रमांकावर आली असून जळगाव जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरी आली आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पणन संचालनालयतर्फे विविध निकषांवर बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. त्यात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने क्रमवारीत राज्यात १७ वे स्थान प्राप्त केले आहे. बाजार समिती सभापती अशोक पाटील, सचिव डॉ. उन्मेष राठोड, अधिकारी कर्मचारी विद्यमान संचालक मंडळ, हमाल, मापाडी, गुमास्ता व्यापारी, शेतकरी यांच्या सर्वांच्या सहकार्याने बाजार समितीने गुणवत्ता प्राप्त केली आहे. अमळनेर बाजार समितीचा विस्तार, वाढलेली आवक, शेतकऱ्यांना रोखीने पेमेंट, त्यांना देण्यात येणारा न्याय, व्यापारी, कर्मचारी हमाल मापाडी, गुमास्ता यांची शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भावना, पारदर्शी कारभार बाजार समितीच्या यशाला पूरक ठरले आहे. १६ मे २०२३ रोजी सभापती अशोक पाटील यांनी सभापती पदाचा पदभार सांभाळला आहे. २०२३-२४ या कालावधीतील क्रमवारी पणन संचालनालयाने जाहीर केली आहे.
या निकषानी मिळवले यश
पायाभूत सुविधा व सेवा सुविधा अंतर्गत ४४.५ गुण, आर्थिक कामकाज निकष बाबत ३० गुण , वैधानिक कामकाजाबाबत ४८ गुण तर इतर निकषाबाबत १९ गुण असे एकूण १४१ गुण मिळाले आहेत. बाजार समितीने नाशिक विभागात तिसरा तर जळगाव जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.
दोन्ही गटातील संचालकांच्या सहकार्याने मिळाले यश
माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार स्मिता वाघ तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटातील संचालकांच्या सहकार्याने बाजार समितीला हे यश प्राप्त झाले आहे.
–अशोक पाटील ,सभापती , अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर