डांगरी गावातूनच काँग्रेसच्या २६ तारखेच्या स्वातंत्र्यलढा स्मरण पदयात्रेला होतोय विरोध

अमळनेर (प्रतिनिधी) येथील क्रांतीपर्व स्मारकावरून वाद पेटला असताना काँग्रेसच्या एका गटाने काढलेल्या स्वातंत्र्य लढा स्मरण पदयात्रेला डांगरी गावातूनच आणि डॉ. उत्तमराव पाटील यांच्या कुटुंबियांनी विरोध केला आहे.

अमळनेर शहरातील अपूर्ण असलेल्या क्रांतीपर्व स्मारकाचे काँग्रेसच्या एका गटाकडून उतावीळपणे कुलूप तोडून लोकार्पण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक श्याम पाटील व सहकाऱ्यांनी याबाबतीत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करत लोकार्पण करणाऱ्यांना उघडे पाडले होते. त्याच काँग्रेसच्या नेत्यांनी २६ एप्रिल रोजी अमळनेर ते डॉ. उत्तमराव पाटील व लीलाताई यांचे गाव असलेल्या डांगरीपर्यंत पदयात्रा काढत असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. मात्र या कार्यक्रमास लीलाताई व डॉ. उत्तमराव पाटील यांच्या कुटुंबियांनी व डांगरी ग्रामस्थांनी विरोध करत या चमकोगिरी करणाऱ्या नेत्याचा निषेध नोंदवला आहे. आम्हाला या पदयात्रेबाबत काहीच कल्पना नसून या नेत्यांनी आमच्याशी संपर्कही केला नसल्याचे डॉ. उत्तमराव पाटील यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. तसेच क्रांतीपर्व स्मारकासाठी प्रयत्न करणाऱ्या शाम पाटील यांच्या सोबतच असल्याचे ही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या पदयात्रेला ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळतो की नाही याबाबत शंका आहे. तसेच काँग्रेसच्या दुसऱ्या गटाला या कार्यक्रमाबाबत काहीही कल्पना नसल्याचे एका वरिष्ठ नेत्याने सांगितले असल्याने पक्षातूनच या पदयात्रेला विरोध असल्याचे ही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आधीच फसलेला लोकार्पणाचा प्रयत्न आणि आता पदयात्रेला असलेला डांगरी ग्रामस्थांचा विरोध यामुळे हा काँग्रेस गट कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.

 

खरा इतिहास दाबून टाकण्यासाठी काही विकृत लोकांकडून प्रयत्न

 

क्रांतिवीरांगणा लीलाताई व डॉ. उत्तमराव पाटील यांच्यासह स्वातंत्र्य युद्धात योगदान देणाऱ्या अमळनेर तालुक्यातील सर्व जाती – धर्माच्या थोर क्रांतीकारकांचा इतिहास देश पातळीवर पोहचविण्यासाठी आपल्याकडून चालल्या प्रयत्नामध्ये अडथळा निर्माण करत खरा इतिहास दाबून टाकण्यासाठी काही विकृत लोकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे

श्याम जयवंतराव पाटील, संकल्पक – क्रांतीपर्व स्मारक , अमळनेर

 

चमकोगिरी करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा निषेध

 

क्रांतीविर कै.डाॅ.उत्तमराव पाटील व क्रांतीविरांगणा लिलाताई  उत्तमराव पाटील यांच्याबाबतीत असलेला २६ रोजीचा कार्यक्रम वादातीत असून त्याबाबत काहीच माहिती न देता चमकोगिरी करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आम्ही डाॅ. उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव, कुटुंबीय, नातेवाईक, भाऊबंद व ग्रामस्थ निषेध करीत आहोत

प्रशांत शांताराम पाटील,  क्रांतिवीर कै. डॉ. उत्तमराव पाटील यांचे पुतणे 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *