अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जवखेडे गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच जयश्री माळी व शाळा व्यवस्थापन समिती, जवखेडेच्या अध्यक्षा कविता पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या मुलांचे व पालकांचे बुके देऊन स्वागत करण्यात आले. एक ते सात क्रमांकांच्या स्टॉलला प्रत्येक विद्यार्थी व पालक यांनी नाव नोंदणी करत भेट दिली. त्यात विद्यार्थ्यांना अवगत असलेल्या कृती, संख्या व अक्षर ओळख, चित्र वर्णन, दोरी उडी, बॉल मारणे, जोडया जुळवणे अशा मनोरंजक पद्धतीने कृती घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्याना चॉकलेट वाटप करण्यात आले. यामुळे प्रवेश पात्र पहिलीचे विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले. यावेळी उपस्थित असलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी पालकांना मुख्याध्यापक छगन पाटील यांनी शाळेच्या उल्लेखनीय बाबींची ओळख करून दिली. इयत्ता पहिलीच्या वर्गात यावर्षी 34 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याचे देखील मुख्याध्यापक यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक रत्नप्रभा साळुंखे, रेखा पाटील,सुनिता पाटील, अर्चना बागुल, मुकेश पाटील, माधवराव ठाकरे, युवा प्रशिक्षणार्थी अनिता बोरसे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका संजीवनी पाटील, आशाताई पाटील, सुनंदा पाटील, भिकूबाई पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचे माता-पालक, तसेच पुरुष पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी मानले.