पंचाहत्तरी निमित्त सत्कार सोहळा उत्साहात, ७५ जोडप्यांच्या हस्ते सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञ
अमळनेर (प्रतिनिधी) प्रा. धर्मसिंह पाटील हे आयुष्यभर कृतिशील जीवन जगलेत. त्यांचं जीवन कर्तव्य प्रदान आहे, असे गौरवोद्गार धुळे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रकाश पाठक यांनी काढले.
अमळनेर प्रताप महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात एक समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले प्रा.धर्मसिंह धनसिंह पाटील यांनी नुकतीच आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याने त्यानिमीत्ताने त्यांचा सत्कार समारोह व सामाजिक सद्भाव गायत्री महायज्ञाचे आयोजन अमृत महोत्सवी सत्कार समारोह समितीच्या वतीन बन्सीलाल पॅलेस, अमळनेर येथे करण्यात आले होते. प्रा.पाटील यांनी केलेल्या कार्याचा उचित सन्मान व्हावा यासाठी त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. सुरवातीला विविध ७५ समाजातील यजमानांच्या हस्ते सामाजिक सद् भाव गायत्री महायज्ञ करण्यात आला.यानंतर जाहीर सत्कार समारंभात मंचावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.प्रकाश पाठक (धुळे) तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर, माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी तसेच प्रा. धर्मसिंह पाटील व शंकूतला पाटील यांची उपस्थिती होती.
सुरवातीला प्रास्तविक बजरंगलाल अग्रवाल यांनी केले केले. तर प्रा. धर्मसिंह पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना आपला जीवनप्रवास मांडला. आपल्या एक तासाच्या व्याख्यानात प्रा. पाठक हे धर्मसिंह पाटील यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकताना म्हणाले की, प्रा. पाटील यांच्या सारखे मानस जेव्हा विशिष्ट जीवन जगून दाखवितात. तेव्हा त्याना शब्दात जखडन कठीण असत, खरतर हा कार्यक्रम सरांसाठी नसून इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी आहे, आयुष कस जगावं हे सरांकडून शिकावं. सरांनी स्वतःला कुठेही कर्त्याची भूमिकेत पुढे आणले नाही, सर्व काही करून नाकर्ता राहणारा हा माणूस, करायचे सर्व पण दिसायचे कुठेही नाही. कारण त्यांनी भगवंतांला कर्ता मानले. सरांचे अकर्तेपण हेच त्यांचे मोठे वैशिट्य आहे, सर म्हणजे कमळाचे देठ आहेत. त्यांच्या कडून कुणाला कोणताही उपद्रव किंवा त्रास झाला नाही. सरांच्या जिवनावर रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव आहे. खरे पाहता अपमान पचविणे फार कठीण असते, सरांच्या जीवनातही तसा अपमान झालाही असेल मात्र त्यावर उत्तर म्हणून प्रतीवर झालेला सरांकडून आठवत नाही. समाजातील सारे माझे बांधव म्हणून त्यांनी 75 गायत्री यज्ञ 75 व्या वाढदिवसानिमित्त केलेत. सरांचे खूपसे संस्कार अबोल असतात आणि ते बोलण्यापेक्षा प्रभावी असतात. हा कार्यक्रम सत्काराचा नव्हे तर संस्काराचा असून तरुण मंडळींनी असेच जगण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अखिल भारतीय सहकार भारतीचे संघटन मंत्री संजय पाचपोर, डॉ. जयदीप पाटील, शशिकांत घासकडबी, डॉ. प्राजक्ता महाले, डॉ. जयमाला पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून सरांवर कौतुकाचा वर्षाव केला. या कार्यक्रमास प्रा.डी.डी.पाटील यांचे विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक कार्यातील सहकारी, आप्तस्वकीय या सर्वांनी उपस्थित राहून त्यांच्यावर सत्काराचा वर्षाव केला. सूत्रसंचालन दिनेश नाईक यांनी केले.