अमळनेर (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ संचलित मराठा जोडो अभियान अंतर्गत जिजाऊ रथ यात्रेचे अमळनेर येथे २२ रोजी आगमन होत आहे. यात्रेच्या स्वागताची तयारी मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.
भोसले गढी वेरूळ ते लाल महाल पुणे पर्यंत १८ मार्च ते १ मे २०२५ दरम्यान या रथयात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईनगर, जळगाव, धरणगाव टाकरखेडा मार्गे २२ रोजी ही रथयात्रा सकाळी ११ वाजता पैलाड येथे पोहचणार आहे. पैलाड येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, सानेगुरुजी पुतळा, शिवाजी महाराज नाट्यगृह, स्टेशन रोड, महाराणा प्रताप चौक, बळीराजा स्मारक, जिजाऊ प्रवेशद्वार याठिकाणी येईल. पैलाड येथे मराठा समाज, मराठा सेवा संघ, मराठा महिला मंडळ त्याचप्रमाणे सर्व समाज महिला मंडळ यांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. पैलाड येथून रथ यात्रेसोबत महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येऊन रस्त्यातील सर्व स्मारक, थोर पुरुषांना अभिवादन करण्यात येणार आहे. बळीराजा चौकात रॅलीचा समारोप होईल. त्यांनतर रथयात्रा मराठा मंगल कार्यालयात जाऊन पुढे मंगरूळ, जानवे, डांगर, चोपडाई मार्गे धुळ्याला रवाना होणार आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधव , महिला, जिजाऊ प्रेमींनी ,शिव प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.