अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात आगी लागण्याच्या घटनाध्ये वाढ झाली आहे. पुन्हा चार गावांत आगी लागून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आगी लागल्या आहेत. शेतकरी या आगीत नुकसानीने होरपळून निघत आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील तरवाडे शिवारात शेतकरी महेंद्र शिवराम पाटील (रा. तरवाडे) याच्या शेतात मक्याचा चारा व कणसाचा ढीग करून ठेवला होता. १९ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास आग लागल्याचे समजल्याने ते इतर शेतकऱ्यांना घेऊन शेतात गेले. त्यावेळी त्यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारा एकमेकांना चिटकलेल्या दिसल्या. व त्यात शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यावेळी गावातील संदीप पाटील याच्या टँकरने पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे स्वरूप जास्त असल्याने अमळनेर नगरपरिषदेचा बंब बोलावून आग विझवण्यात आली. या आगीत शेतकऱ्याचे एक लाख वीस हजाराचा मका व पन्नास हजाराच्या ठिबक नळ्या जळून १ लाख ७० हजार रुपयांचे एकूण नुकसान झाले आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
सदर नुकसानीची लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. त्याचप्रमाणे २० रोजी दुपारी अडीच पावणे तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील ढेकू खुर्द येथे देखील विद्युत तारांचा शॉर्ट सर्किट होऊन नथु गुणवंतराव पाटील यांचा १ लाख ३५ हजार रुपयांचा दोन बिघे मका आणि ठिबक साहित्य असे जळून खाक झाले. तर शेजारील शेत मालक सुधाकर नाटू पाटील यांच्या सव्वा तीन बिघे शेतातील २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मका आणि ठिबक साहित्य जळून खाक झाले. वाऱ्यामुळे आग त्वरित पसरली. त्याचवेळी अमळनेरचा अग्निशमन बंब डांगरी येथे आग लागल्याने तेथे गेला होता. ढेकू येथे गावातील टँकरने आग आटोक्यात आणण्यात आली.
डांगरी येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास खळवाडीस आग लागून झाडे झुडुपे जळाली. दिनेश शिसोदे यांनी अग्निशमन दलाला कळवताच एक पथकाने तेथे आग विझवली. तर थोड्या वेळात मांडळ येथे मोहाडी रस्त्याला आग लागल्याने तेथे डॉ अशोक पाटील यांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे दुसरा बंब तेथे पाठवण्यात आला होता. तेथेही काही झाडे जळून खाक झाली आहेत. सर्वत्र आग विझवण्यासाठी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशावरून अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, आकाश बाविस्कर, फारुख शेख, लखन कंखरे यांनी सहकार्य केले. गेल्या काही दिवसातच किमान १५ ते १६ ठिकाणी आगी लागल्याने अमळनेर तालुका आगीचा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. बहुतेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आगी लागत आहे. त्यामुळे विद्युत मंडळाने त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी, अशी मागणी होत आहे.