
प्रतिनिधी अमळनेर एसटी महामंडळाच्या बनावट प्रवाशांना आळा बसावा यासाठी जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी- विद्यार्थी प्रवासी तिकीटाच्या सवलतीमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच आधार क्रमांक जोडलेले स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे.
एसटी महामंडळ जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी- विद्यार्थीनी, अशा विविध 24 सामाजिक घटकांना प्रवासी तिकीटात 50 पासून 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते. या योजनेचा वर्षाला 39 कोटी प्रवासी लाभ घेतात. परंतु काही जण विशेषत: ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग खोटे दाखले आणि बोगस ओळखपत्र तयार करून सवलतीचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी वारंवार महामंडळाकडे दाखल आहेत. वाहक (कंडक्टर) आणि बनावट सवलत धारक यांच्यात त्यामुळे अनेक वेळा वाद-विवाद होऊन प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत घटना पोहचली आहेत. या घटना रोखण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना तयार केली आहे. या स्मार्ट कार्ड लाभार्थीच्या थेट आधार क्रमांकाशी जोडण्यामुळे त्या लाभार्थीची अचूक माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी-विद्यार्थीनी व इतर मासिक, त्रैमासिक पास धारकांना या स्मार्टकार्ड मुळे दरमहा ऑनलाईन रक्कम भरणा करण्याची सोय असल्यामुळे त्यांचे दरमहिन्याचे एसटी बसस्थानकावर जाऊन पास नुतनीकरण करण्याची दगदग कमी होणार आहे. ही योजना अमळनेर बस आगारात जून महिन्यात सुरू होणार आहे सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना बसभाडे मोफत प्रवास असल्याने लागत नाही. त्यामुळे जून सुरू झाल्यावर सुरू होईल अशी माहिती आगार प्रमुख अर्चना देवरे यांनी दिली आहे.